पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख पदावरून नुकतेच निवृत्त झालेले राहिल शरीफ यांच्याबाबत नवा खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. राहिल शरीफ यांनी आपल्याला देश सोडून पळून जाण्यात मदत केल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला आहे. सोमवारी रात्री पाकिस्तानच्या दुनिया न्यूज या वृत्त वाहिनीवरील एका कार्यक्रमात त्यांनी अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. राहिल शरीफ यांनी आपल्याला पाकिस्तानातून पळून जाण्यास मदत केल्याचे मी छातीठोकपणे सांगतो. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. सैन्यदलात मी त्यांचा प्रमुख होतो. माझ्याविरोधात राजकारण करण्यात आले. मला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली होती. माझ्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यांना राजकीय मुद्दा बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

वर्ष २०१६ मध्ये उपचाराचा बहाणा करून मुशर्रफ यांनी पाकिस्तानातून पळ काढला होता. त्यांनी ४ ते ६ आठवड्यात पाकिस्तानात परतण्याचा शब्द दिला होता. परंतु तेव्हापासून ते अजूनही पाकिस्तानात परत आलेले नाहीत. त्यांच्याविरोधात राजद्रोह आणि हत्येचा खटला सुरू आहे. बेनझीर भुट्टो यांची हत्या प्रकरणात सरकार पक्षाने मुशर्रफ यांच्याविरोधात ६२ साक्षीदार सादर केले आहेत.
राहिल शरीफ यांच्या मदतीसंदर्भात ते म्हणाले, न्यायालयांवर राहिल शरीफ यांचा प्रभाव होता. आपल्या न्याय व्यवस्थेने हद्दीत राहून योग्य न्याय द्यावा, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या न्याय व्यवस्थेवरही टीका केली. पाकिस्तानातील न्यायालये दबावात येऊन निर्णय देतात. पडद्याआडून माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी जो राजकीय दबाव होता. तो कमी करण्यात राहिल शरीफ यांची महत्वाची भूमिका होती.
माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी सरकार न्यायालयांवर दबाव आणत होती. राहिल शरीफ यांनी तो दबाव हटवला. राहिल शरीफ यांनी सरकारला माझ्याविरोधात कारवाई करण्यास न्यायालयांवर दबाव टाकू नये म्हणून राजी केले. त्यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला आणि मी उपचारासाठी देशाबाहेर गेलो, असे ते म्हणाले.