पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीनच्या दरात लवकरात लवकर म्हणजे पुढील आठवडय़ात वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत पेट्रोलियममंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी शुक्रवारी येथे दिले. अत्यंत कठीण आणि क्लेशदायक निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.
पेट्रोलसह विविध तेल उत्पादनांच्या दरांत त्वरित वाढ करण्याचा प्रस्ताव नाही, असे रेड्डी यांनी सांगितले. मात्र ही वाढ कधी होणार ते त्यांनी स्पष्ट केले नाही. पुढील आठवडय़ात मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वाढ करण्यात येईल, असे संकेत मिळत आहेत. तेल कंपन्यांना उद्या केवळ पेट्रोलच्या दरात वाढ करण्याची परवानगी दिली तर राजकीय विरोधक डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीनच्या दरात वाढ करू देणार नाहीत, अशी मंत्रालयाला भीती वाटत आहे.
तेल कंपन्यांना डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या विक्रीपोटी दररोज ५६० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे, तर पेट्रोलवर दररोज १६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंत्रालय दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. दरात वाढ न केल्यास तेल कंपन्यांना दोन लाख कोटी रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागणार असून ही तूट भरून काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्हाला क्लेशदायक निर्णय घ्यावे लागत आहेत, असेही रेड्डी म्हणाले.