देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा कपात करण्यात आली. त्यामुळे आता पेट्रोल प्रतिलीटरमागे ८९ पैसे आणि डिझेल प्रतिलीटरमागे ४९ पैशांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच कपात झाली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या दरकपातीनंतर नवी दिल्लीत आता पेट्रोलचे दर ६४.७६ आणि डिझेलचे दर ५४.७० इतका असेल. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते.