केरळच्या पलक्कड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) कार्यकर्त्याला सोमवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. जिल्हा पोलिस प्रमुख आर विश्वनाथ यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला पीएफआय कार्यकर्ता जिल्ह्यातील मंब्रम येथील ए संजीतच्या हत्येत थेट सहभागी होता. या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात आरोपी पीएफआय कार्यकर्त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही कारण तपासाचा भाग म्हणून त्याची ओळख परेड केली जाणार आहे. पीडितेच्या पत्नीने संजीतची हत्या करणाऱ्या लोकांना ती ओळखू शकते असे सांगितले होते. पोलिसांनी सांगितले की, संजीत १५ नोव्हेंबर रोजी पत्नीला कार्यालयात घेऊन जात असताना त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले.

भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि संघ परिवाराच्या संघटनांनी आरोप केला आहे की इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय)चे कार्यकर्ते या दिवसाढवळ्या घडलेल्या हत्येमागे होते. मात्र, एसडीपीआयने भाजपाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) करण्याची मागणी केली. भाजपा नेत्याने अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, गेल्या पाच वर्षांत कथित जिहादी गटांकडून केरळमध्ये १० आरएसएस-भाजप३ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ५० संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांची जिहादी संघटनांनी हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.