Pilot May Have Crashed Air India Plane Intentionally: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये २४१ जणांना जीव गमवावा लागला होता. अशात भारतातील एका आघाडीच्या विमान सुरक्षा तज्ज्ञाने अशी शक्यता वर्तवली आहे की, एअर इंडिया फ्लाइट १७१ चा अपघात हा जाणीवपूर्वक मानवी कृतीचा परिणाम असू शकतो, ज्यामुळे पहिल्यांदाच पायलटमुळे अपघात झाला असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी फ्युएल कटऑफ स्विचेस आणि कॉकपिट ऑडिओच्या क्रमाकडे लक्ष वेधले असून, हा अपघात कॉकपिटमध्ये जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे झाला असावा, असे म्हटले आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना कॅप्टन मोहन रंगनाथन यांना विचारण्यात आले की, एखाद्या वैमानिकाने जाणूनबुजून फ्युएल बंद केले असावे का? कारण त्याला माहीत होते की असे केल्याने अपघात होऊ शकतो. तेव्हा कॅप्टन रंगनाथन म्हणाले, “अगदी नक्कीच.”
“हे मॅन्युअली करावे लागते का?”, असे कॅप्टन रंगनाथन यांना विचारले असता ते म्हणाले, “फ्युएल सिलेक्टर्स स्लायडिंग प्रकारचे नसल्यामुळे, ते आपोआप किंवा वीज खंडित झाल्यामुळे बंद होऊ शकत नाहीत. हे सिलेक्टर्स अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की ते एका निश्चित स्लॉटमध्ये राहतात आणि त्यांना वर किंवा खाली हलवण्यासाठी प्रथम बाहेर खेचावे लागते. त्यामुळे ते आपोआप बंद होण्याची शक्यता नसते. त्यामुळे हे निश्चितपणे जाणीवपूर्वक, हाताने बंद केले असण्याची शक्यता आहे.”
दरम्यान, आजच भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था – AAIB) अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला, याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. १५ पानांच्या या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, इंजिन १ आणि २ चे दोन्ही फ्युएल स्विच एकमेकांपासून एका सेकंदात ‘रन’ वरून ‘कट ऑफ’ मध्ये बदलले गेले. कॉकपिटच्या मध्यवर्ती भागात पायथ्याशी असलेले हे स्विच गार्ड रेलने संरक्षित असतात आणि त्यांना हलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ते संवेदनशील नसतात आणि टर्ब्युलन्स, पॉवर फेल्युअर किंवा सॉफ्टवेअर ग्लिचमुळे ते ट्रिगर होऊ शकत नाहीत.