Pilots association on Ahmedabad Crash AAIB Report: महिन्यापूर्वी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एआय-१७१ ड्रिमलायनर बोईंग हे विमान कोसळले होते. आज विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) अपघाताप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला. १५ पानी अहवालात कॉकपिटमध्ये दोन पायलट्समध्ये विसंवाद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावरून आता एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (ALPA) ने सदर अहवालावर चिंता व्यक्त केली. अहमदाबादमधील अपघातासाठी पायलटला जबाबदार होते, असे गृहित धरल्याचे सदर अहवालातून दिसून येत आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.

एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, तपासाचा एकंदर सूर आणि दिशा वैमानिकांच्या चुकीकडे पक्षपातीपणा दर्शवते. आम्ही या अनुमानाला स्पष्टपणे नाकारतो आणि निष्पक्ष, तथ्य-आधारित चौकशीचा आग्रह करत आहोत.

याचबरोबर असोसिएशनने तपास प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही नमूद केले आहे. तपासात कमालीची गुप्तता पाळली जात असल्यामुळे त्यावरची विश्वासार्हता आणि विश्वास कमी होत आहे. अनुभवी व्यक्ती विशेषतः लाइन पायलट्सना अद्यापही तपासात सामावून घेतलेले नाही.

विमानाने उड्डाण घेताच अवघ्या काही सेकंदात विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कटऑफ मोडवर गेले होते. ज्यामुळे हवेत असतानाच विमानाचे इंजिन बंद झाले, असे एएआयबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमधील संवादाचा काही भागही देण्यात आला आहे.

कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डरमधील नोंदीनुसार एका पायलटने विचारले की, तू स्विच बंद का केलास? त्यावर दुसरा पायलट म्हणतो की, मी काहीही केले नाही. यावरून कॉकपिटमध्ये काहीतरी विसंवाद झाला असावा किंवा तांत्रिक गफलत झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अहवालामधील माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांना कशी मिळाली?

पायलट्स असोसिएशनने १० जुलै रोजी अमेरिकेतील वॉल स्ट्रीज जर्नलमध्ये छापून आलेल्या एका लेखाचा संदर्भ दिला आहे. इंजिन फ्युअल कंट्रोल स्विचेसमध्ये गडबड झाल्यामुळे अपघात झाल्याचे या लेखात म्हटले होते. अहवाल अधिकृतरित्या प्रसिद्ध होण्यापूर्वीच माध्यमांना ही माहिती कशी मिळाली, असा सवाल असोसिएशनने विचारला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत इतकी संवेदनशील माहिती कशी काय पोहोचली? असा असोसिएशनचा सवाल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता.