Ahmedabad plane crash investigation महिन्याभरापूर्वी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एआय-१७१ ड्रिमलायनर बोईंग हे विमान कोसळले होते. काही दिवसांपूर्वी विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) अपघाताप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला होता. या १५ पानी अहवालात कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये विसंवाद झाल्याचे नमूद करण्यात आले. आता या विमान अपघाताबाबत निराधार आणि बदनामीकारक बातम्या दिल्याबद्दल फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी)ने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ विरोधात कायदेशीर नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
विदेशी माध्यमांना नोटीस बजावण्याचे कारण काय?
१२ जूनच्या दुर्घटनेबाबत भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) च्या प्राथमिक अहवालात असे सांगण्यात आले आहे की, बोइंग ७८७-८ ड्रीमलायनरच्या अहमदाबाद येथील अपघातावेळी टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच एका सेकंदाच्या अंतराने एका पाठोपाठ एक दोन्ही इंजिनचे इंधन पुरवठा स्विच हे कट ऑफ स्थितीत हलवण्यात आले होते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगनुसार, एका वैमानिकाने इंधन का बंद केले आहे असे विचारले असता; दुसऱ्याने उत्तर दिले की त्याने ते केले नाही. एएआयबीच्या अहवालात स्विच कोणी बंद केले हे स्पष्ट केलेले नाही किंवा वैमानिकांना दोषही देण्यात आलेला नाही.
परंतु, वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या पुराव्यांच्या मूल्यांकनाशी परिचित असलेल्या एका स्त्रोताच्या आधारावर म्हटले की कॅप्टनने जाणूनबुजून इंधन स्विच बंद केले. तसेच रॉयटर्सच्याही एका बातमीत सांगण्यात आले की, ही कॅप्टनची चूक होती. कायदेशीर नोटीसमध्ये दोन्ही माध्यमसमूहांकडून माफीची आणि दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. “अहवालात कुठेही असे नमूद केलेले नाही की पायलटच्या चुकीमुळे इंधन नियंत्रण स्विच बंद झाले. त्यांनी अहवाल योग्यरित्या वाचला नाही आणि आम्ही त्याविरोधात कारवाई करू,” असे एफआयपीचे अध्यक्ष कॅप्टन सीएस रंधावा म्हणाले.
एअर इंडियाच्या चौकशी अहवालावर टीका
एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियासारख्या अनेक पायलट संघटनांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. चुकीच्या बातम्यांमुळे भारताच्या विमान वाहतूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डगमगू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एएआयबीने स्वतः आंतरराष्ट्रीय माध्यमांना फटकारले आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
देशातील विमान अपघात आणि महत्त्वाच्या वाहतूक घटनांच्या चौकशीसाठी जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) ने म्हटले आहे की, १२ जून रोजी एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या अपघाताच्या चौकशीत इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य नाही. दोन्ही इंजिनचे इंधन स्विच कट ऑफ स्थितीत हलवण्यात वरिष्ठ वैमानिकाला दोष देण्यात आल्यानंतर एनटीएसबीच्या अध्यक्षा जेनिफर होमेंडी म्हणाल्या, “एअर इंडिया १७१ च्या अपघाताबाबत माध्यमांनी दिलेली माहिती चुकीची आणि काल्पनिक आहेत. भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने नुकताच त्यांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अशा स्वरूपाच्या तपासास वेळ लागतो,” असे त्या म्हणाल्या.