पी. एल. पुनिया यांचा दावा

मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगाकडून रोहित वेमूला हा दलित नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. हा अहवाल पूर्णपणे बनावट असून, केंद्रातील भाजप सरकार खोटय़ा पद्धतीने आपला दावा सिद्ध करू पाहत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी म्हटले आहे.

भाजपाचे मंत्री सुरुवातीपासूनच रोहित वेमूला याला दलितऐवजी अन्य मागास प्रवर्गातील असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठीच या चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. गुंटूरचे जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिलेल्या अहवालानुसार वेमूला हा दलितच होता. त्यामुळे नव्याने देण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल हा पूर्णत: चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने रोहित वेमूला या दलित नसल्याचे म्हटले आहे.

जातीवर टिप्पणी करण्याचा कोणताही अधिकार या आयोगाला नाही. जातीबद्दल फक्त जिल्हाधिकारी आणि महसूल बोर्ड यांना बोलण्याचे अधिकार आहेत.

 

‘भारताने सीमा भागात शांतता राखावी’

बीजिंग : सीमा भागात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी भारत व चीन या दोन देशांमध्ये झालेल्या सहमतीशी ‘विसंगत’ असे भारताने काही करू नये, असे चिनी लष्कराने गुरुवारी सांगितले. चीनलगतच्या सीमेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्याची भारताची योजना असल्याबाबतच्या वृतावर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे. भारत-चीन सीमेवर शांतता व स्थैर्य कायम राखणे हे दोन्ही देशांचे महत्त्वाचे मतैक्य आहे. याला विसंगत असे वागण्याऐवजी या मतैक्यासाठी भारत आणखी काही करू शकतो अशी आम्हाला आशा आहे, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्विआन म्हणाले.

उभी चढाई करण्याची क्षमता आणि २९० किलोमीटरचा पल्ला असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्रे जादा संख्येत तैनात करण्यास भारत सरकारने मंजुरी दिली असून, चीनलगतच्या सीमेवरील क्षमता वाढवण्यासाठी ती पूर्व क्षेत्रात तैनात केली जातील, असे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चिनी सैन्याने ही प्रतिक्रिया दिली. ४३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची चवथी तुकडी उभारण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याचे संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले.