Plane Landing Airport : फ्रान्सच्या पॅरिसवरून कोर्सिकाला एक विमान जात असताना अजॅक्सिओ विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अजॅक्सिओच्या नेपोलियन बोनापार्ट विमानतळावर लँड होणार होतं. विमान लँडिंगसाठी विमानतळाच्या जवळही आलं होतं. मात्र, एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा सिग्नल न मिळाल्याने विमानाने जवळपास तासभर हवेतच घिरट्या घातल्या. तब्बल एका तासाने विमानाचं विमानतळावर लँडिंग झालं.

अजॅक्सिओच्या विमानतळावर विमानाच्या लँडिंगसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा सिग्नल का मिळाला नाही? यांचं कारण ऐकल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. अजॅक्सिओच्या नेपोलियन बोनापार्ट विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलर अधिकारी रात्रीच्या शिफ्टमध्ये झोपी गेल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे विमान हवेत घिरट्या घालत राहिलं. या संदर्भातील वृत्त द टाईम्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

वृत्तानुसार, मंगळवारी मध्यरात्री एअर कोर्सिका एअरबस ए३२० हे विमान फ्रान्सच्या कोर्सिकाची राजधानी असलेल्या अजॅक्सिओमधील विमानतळावर लँड होणार होतं. विमान लँडिंगसाठी विमानतळाच्या जवळ आलं. मात्र, तरीही विमानतळाच्या नियंत्रण टॉवरकडून त्या विमानाला लँडिंगचा कोणाताही सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विमान पुन्हा अवकाशात झेपावलं.

डेली मेलच्या एका वृत्तानुसार, पर्यटकांसह प्रवासी विमानाला १८ मिनिटे हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. तसेच फ्रान्सच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानेही बुधवारी या घटनेची पुष्टी केल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या कॅबिनकडे धाव घेतली. द टाईम्सच्या वृत्तानुसार एअर ट्रॅफिक कंट्रोलर त्याच्या डेस्कवर झोपलेला आढळला. मात्र, त्यानंतर त्याला जाग आली आणि त्याने त्वरीत धावपट्टीवर विमानाच्या लँडिंगसाठी सिग्नल दिला अन् विमानाचं अखेर सुरक्षितपणे लँडिंग झालं.

फ्रान्सच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने काय म्हटलं?

अजॅक्सिओच्या विमानतळावर विमानाच्या लँडिंगच्या संदर्भात घडलेल्या प्रकाराबाबत फ्रान्सच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने प्रतिक्रिया देत या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच संबंधित एअर ट्रॅफिक कंट्रोलरची चौकशी सुरू करण्यात आली असून सध्या तरी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितलं की संभाव्य दंड विचारात घेतला जात आहे.