नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते. दोन तासांपासून हे विमान रडारवरून बेपत्ता झालं आहे, याबाबतची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. संबंधित विमानाचा संपर्क तुटल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्या विमानात ४ भारतीय नागरिकांसह दोन इतर परदेशी नागरिक आहेत. तर उर्वरित सर्व प्रवाशी हे नेपाळ देशाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेल्या विमानाने रविवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान रडारमधून गायब झालं आहे. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं आहे. तसेच नेपाळ पोलिसांनी देखील शोधमोहीम सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते विष्णू यांनी सांगितलं की, “२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता झालं आहे. विमान बेपत्ता होऊन दोन तास झाले आहेत. अद्याप विमानाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शोध सुरू आहे. नेपाळी लष्कर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने विमानाचा शोध घेत आहे. नेपाळ पोलीस देखील बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फ्लाइटमध्ये तीन क्रू सदस्य असून कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाइट अटेंडंट किस्मी थापा आणि अन्य क्रू मेंबर उत्सव पोखरेल अशी त्यांची नावं आहेत. उड्डाण केल्यानंतर २५ मिनिटांत हे विमान जोमसोमला पोहोचणं अपेक्षित होतं. पण रडारवरून संपर्क तुटल्यानंतर दोन तासांपासून हे विमान बेपत्ता आहे.