आयपीएल सामन्यात राडा करण्याचा कट रचणाऱ्या चार युवकांना पंजाबमधील भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चौघं पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. खालिस्तानच्या मुद्द्यावरुन राडा करण्याचा त्यांचा कट होता अशी माहिती आहे. बस आणि दारुचे अड्डे जाळून खालिस्तानचा जनमत संग्रह-2020 च्या मुद्द्याचा प्रचार करण्याची जबाबदारी या तरुणांवर देण्यात आली होती,” अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.

मनवीर सिंह, जसप्रीत सिंह, सुखविंदर सिंह आणि रणधीर सिंह अशी अटक केलेल्या युवकांची नावं आहेत. हे चौघंही शहीद भगत सिंह नगर जिल्ह्यातील खानखाना गावचे आहेत. दारुच्या भट्टीवर आग लावण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली, त्यावेळी त्यांच्याकडून दहा लिटर डिझेल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांना आयएसआयच्या एका एजंटने धार्मिक भावना भडकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. प्राथमिक चौकशीत या तरुणांनी फेसबुकच्या माध्यमातून दीप कौर उर्फ कुलवीर नावाच्या महिलेने कट्टरतावादाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली. त्यानंतर तिनेच फतेह सिंह नावाच्या आयएसआय एजंटशी आपली ओळख करून दिली असं संशयितांनी सांगितलं. फतेह सिंहने या तरुणांना दारुची दुकानं आणि बस पेटवून वातावरण गढूळ करण्याची जबाबदारी दिली होती.