विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे NDA बहुमत मिळवण्यास अपयशी ठरले, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच त्यांच्या नेतृत्वाखालील NDA ला २०१४ मध्ये लोकांनी बहुमत दिले. असेच काहीसे एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घडू शकते. कारण दीर्घकालीन मुख्यमंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे तीन पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय मला सध्या दिसत आहेत, असे पवार म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत असे मी म्हणत नाही. मायावती, ममता आणि नायडू हे मुख्यमंत्रिपदाची धुरा वाहिलेले उमेदवार आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी ते देखील योग्य पर्याय ठरू शकतात, असेही पवार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याशिवाय, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच राहुल गांधींपेक्षा या तीन उमेदवारांना प्रबळ दावेदार मानता का? या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले की मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक आहे.