नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेल्या वाढीत आयात शुल्काविरोधात देश समर्थपणे उभा राहील असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. स्वदेशीच्या मंत्रातून देश प्रगतिपथावर राहील, त्याला कोणीही रोखू शकणार नाही असे मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात अधोरेखित केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख पंतप्रधानांनी टाळला असला तरी, जगभरात आर्थिक स्वार्थ वाढू लागल्याचे नमूद केले. त्यातून उद्भवणाऱ्या संकटात रडण्याचे कारण नाही. तर दाम कम, दम जादा हा मंत्र स्वीकारून भारतीय उत्पादकांनी दर्जेदार उत्पादनांनी जगाच्या बाजारपेठेत लौकिक मिळवावा, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसे झाले तर कोणाचाही आर्थिक स्वार्थ भारताला त्यांच्या जाळ्यात अडकवू शकणार नाही’, असे आवाहन मोदींनी देशातील लाखो लघुउद्याोजकांना केले.
अमेरिकेच्या आयातकराच्या धोरणामुळे भारताला आर्थिक संकटात आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा मुद्दाही मोदींनी भाषणामध्ये उपस्थित केला. ‘शेतकरीविरोधी धोरण भारत सहन करणार नाही. देशातील शेतकरी, पशुपालक, मच्छीमार यांचे कधीही नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या हितासाठी भिंत बनून उभा राहीन’, अशी ग्वाही मोदींनी दिली.
ऑपरेशन सिंदूरचे यश, देशांतर्गत सुरक्षेचे महत्त्व, विकसित भारताचे लक्ष्य या मुद्द्यांचा ऊहापोह त्यांनी १०३ मिनिटांच्या भाषणात केला.
घुसखोरीतून लोकसंख्या बदलाचा धोका?
सीमाभागांत घुसखोरी करून डेमोग्राफिक बदल (स्थलांतरातून लोकसंख्येच्या रचनेत बदल) केले जात आहेत. या घुसखोरीतून देशातील युवकांचे रोजगार हडपले जात आहेत. डेमोग्राफिक बदल करणारी ही घुसखोरी देशासमोरील मोठे संकट असून त्यातून सामाजिक तणाव निर्माण होतो. ही घुसखोरी सहन केली जाणार नाही. केंद्र सरकारने घुसखोरीला आळा घालण्यासाठी ‘उच्चस्तरीय डेमोग्राफी मिशन’ सुरू केले असून विशिष्ट वेळेत उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे मोदी म्हणाले.
महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम
महात्मा फुलेंची २०० वी जयंती साजरी केली जाणार असून केंद्र सरकारच्या वतीने जयंतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
संघाचा गौरव
●शताब्दी साजरी करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष उल्लेख मोदींनी भाषणात केला.
●शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. त्यांनी गौरवशाली काम केले आहे.
●व्यक्तीनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे. लक्षावधी स्वयंसेवकांनी देशासाठी जीवन समर्पित केले.
●संघ जगातील सर्वात मोठी ‘एनजीओ’ आहे, अशा शब्दांत मोदींनी संघकार्याचा गौरव केला.