चीनचे नवनियुक्त अध्यक्ष झी जिनपिंग यांची पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी रात्री भेट घेतली. भेटीमध्ये त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवर चीनमध्ये बांधण्यात येणाऱया तीन धरणांचा विषय उपस्थित केला. 
ब्रिक्स देशांच्या पाचव्या परिषदेसाठी हे दोन्ही नेते डर्बनमध्ये आले आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग आणि जिनपिंग यांची भेट झाली. जिनपिंग यांनी नुकताच चीनच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांची आणि डॉ. सिंग यांची ही पहिलीच भेट आहे. दोन्ही देशाच्या नेत्यांनी बैठकीमध्ये पाण्याचा प्रश्नावर चर्चा केली, एवढीच माहिती सूत्रांनी दिली. सुमारे २५ मिनिटे या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनमध्ये तीन धरणे बांधण्यात येणार आहेत. त्याबद्दल भारताची भूमिका डॉ. सिंग यांनी जिनपिंग यांना बैठकीमध्ये सांगितली. या धरणांमुळे भारतात या नदीच्या प्रवाहात पाणी साठण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा आक्षेप डॉ. सिंग यांनी उपस्थित केला. मात्र, या तिन्ही धरणांमध्ये पाणी साठविले जाणार नसल्याचे जिनपिंग यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा विषयही बैठकीत चर्चिला गेला.