नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसीय ब्रिटन, मालदीव दौऱ्यासाठी रवाना झाले. भारत आणि ब्रिटनमध्ये एक व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे, त्यामध्ये अलीकडील वर्षांत लक्षणीय प्रगती झाल्याचे मोदी यांनी रवाना होण्यापूर्वी म्हटले आहे. ब्रिटनच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार आहेत.

‘‘ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या भेटीत दोन्ही देशांदरम्यान समृद्धी, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने आर्थिक भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याची संधी आपल्याला मिळेल,’’ असे मोदी म्हणाले. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी किंग चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेतील. ब्रिटननंतर पंतप्रधान मोदी अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून मालदीवला जातील. मुइझ्झू यांच्या कारकीर्दीत दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये ही एक मोठी प्रगती असल्याचे मानले जात आहे. मालदीवच्या स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात मोदी सहभागी होतील.

‘‘या वर्षी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आहे. व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या आपल्या संयुक्त दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी आपले सहकार्य बळकट करताना, अध्यक्ष मुइझ्झू आणि इतर राजकीय नेतृत्वाच्या भेटींसाठी मी उत्सुक आहे,’’ असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांशी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आदी विविध क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारत आणि ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार आहे. परंतु भारताच्या देशांतर्गत उद्याोगावर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा दावा काँग्रेसने बुधवारी केला. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, ‘‘आज पुन्हा सुपर प्रीमियम फ्रिक्वेंट फ्लायर भारतातून बाहेर पडत आहेत, यावेळी ब्रिटन आणि मालदीवला ते जात आहेत. हा दौरा भारत-ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी करण्यासाठी आहे, ज्याचे प्रत्यक्षात अनेक भागधारकांसाठी घातक परिणाम होतील.’’