PM Modi message Daam kam dum zyaada amid tariff war with US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९व्या स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी समृद्ध आणि आत्मनिर्भर देशाच्या उभारणीसाठी भारताने उच्च गुणवत्ता असलेल्या आणि परवडणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यासाठी ‘दाम कम, दम ज्यादा’ हा मंत्र देखील मोदी यांनी सांगितला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“एका देशासाठी आत्मसन्मानाची सर्वात मोठी कसोटी ही आजही त्या देशाची आत्मनिर्भरता आहे. विकसित भारताचा आधार हा देखील आत्मनिर्भर भारत आहे. जे दुसऱ्यावर अवलंबून राहातात त्यांच्या स्वतंत्र्यावर तेवढेच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. दुर्दैव तर तेव्हा सुरू होते जेव्हा अवलंबून राहण्याची सवय लागते आणि हे लक्षात देखील येऊ नये की आपण कधी स्वावलंबी राहणे सोडून दुसऱ्यावर अवलंबून राहू लागतो. ही सवय धोक्यांनी भरलेली आहे. यामुळे आत्मनिर्भर होताना प्रत्येक क्षणी जागरूक राहावे लागते,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“आत्मनिर्भरतेचा संबंध फक्त आयात आणि निर्यात इतका मर्यादित नाही. आत्मनिर्भरतेचे नाते आपल्या सामर्थ्याशी जोडलेले आहे. जेव्हा आत्मनिर्भरता संपू लागते तेव्हा सामर्थ्य देखील सतत कमकूवत होत जाते. त्यामुळे आपले सामर्थ वाचवण्यासाठी आणि ते वाढवत राहण्यासाठी आत्मनिर्भर होणे खूप आवश्यक आहे,” असेही पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले.
अमेरिका आणि भारत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापार तणाव वाढला आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादल्यानंतर हा तणाव आणखीच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले आहे.
“आपण दुसऱ्याची रेषा कमी करण्यासाठी आपण आपली ऊर्जा वाया घालवू नये. आपण पूर्ण शक्तीने आपली रेषा वाढवली पाहिजे. असे केले तर जग आपल्या ताकदीचा सन्मान करेल. आज जेव्हा जागतिक परिस्थितीत आर्थिक स्वार्थ दिवसेंदिवस वाढत आहे, तेव्हा काळाची गरज आहे की आपण बसून रडणे नव्हे तर धैर्याने आपली रेषा वाढवणे गरजेचे आहे,” असेही मोदी पुढे बोलताना म्हणाले.
जग गुणवत्तेला महत्त्व देते आणि जर आपल्याला जागतिक बाजारात भारताची मजबूत प्रतिमा तयार करायची असेल, तर आपण उच्च गुणवत्तेच्या वस्तूंच्या निर्मितीवर लक्ष्य दिले पाहिजे, आपण दाम कम, दम ज्यादा या मंत्राने काम केले पाहेज, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.