scorecardresearch

“भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू, निव्वळ राजकारण….”: पंतप्रधान मोदी

आपल्याला आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली मूल्ये जिवंत ठेवायची आहेत, असं मोदी म्हणाले.

“आज कोट्यवधी भारतीय स्वर्णिम भारताची पायाभरणी करत आहेत. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती दडलेली आहे. राष्ट्र आपल्यापासून अस्तित्वात आहे आणि राष्ट्रापासूनच आपले अस्तित्व आहे. नवीन भारताच्या निर्मितीमध्ये ही जाणीव भारतीयांची सर्वात मोठी ताकद बनत आहे,” असे वक्तव्य ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित करताना केले.

“आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यामध्ये भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आम्ही निर्माण करत आहोत. ज्याचा विचार आणि दृष्टीकोन नाविन्यपूर्ण आहे आणि ज्याचे निर्णय प्रगतीशील आहेत, अशा भारताचा उदय होताना आपण पाहतोय,” असं मोदी म्हणाले.

“राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. आणि अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले आहे. जेव्हा जग गडद अंधारात होते, स्त्रियांबद्दलच्या जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यांसारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले,” असं मोदी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

“आपल्याला आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली मूल्ये जिवंत ठेवायची आहेत, आपली अध्यात्म, आपली विविधता जतन आणि संवर्धन करायचे आहे आणि त्याच वेळी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या प्रणालींचे सतत आधुनिकीकरण करायचे आहे. अमृतकाळाची ही वेळ झोपेत स्वप्न पाहण्याची नाही तर जागे होऊन आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी आहे. येणारी २५ वर्षे मेहनत, त्याग, तपस्या आणि तपश्चर्य करण्यासाठी आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत आपल्या समाजाने जे गमावले ते परत मिळवण्यासाठी हा २५ वर्षांचा कालावधी आहे,” असं मोदींनी सांगितलं.

“गेल्या ७५ वर्षात आपण फक्त हक्कासाठी बोललो, हक्कासाठी लढलो, वेळ वाया घालवला. अधिकाराची चर्चा, काही प्रमाणात, काही वेळेसाठी, कोणत्याही एका परिस्थितीत खरी असू शकते, परंतु कर्तव्य पूर्णपणे विसरणे, ही भूमिका भारताला कमकुवत ठेवण्यात मोठी भूमिका बजावते. परंतु आता जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तेव्हा जगाने भारताला नीट ओळखले पाहिजे, ही आपलीही जबाबदारी आहे,” असं म्हणत मोदींना नागरिकांना कर्तव्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला.

“भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न कसे केले जात आहेत, याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच काही चालू आहे. हे निव्वळ राजकारण आहे, असे सांगून आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. हे राजकारण नाही, हा आपल्या देशाचा प्रश्न आहे,” असं मोदी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm modi speech at bramhakumaris program over discriminations hrc

ताज्या बातम्या