पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १० दिवसांमध्ये बिहारमधील १६ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा आणि उद्घाटन करणार आहे. यासंदर्भातील पहिली घोषणा रविवारी करण्यात आली. रविवारी मोदींनी बिहारमधील तीन इंधन प्रकल्पांची घोषणा केली. या प्रकल्पांची किंमत ९०० कोटी इतकी आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून बिहारसाठी काही खास योजनांची घोषणा केली जाणार असल्याचे सुत्रांनी म्हटलं आहे. प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत गोष्टींसंदर्भात हे प्रकल्प असतील असं सुत्रांनी म्हटलं आहे. याबद्दलचे वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. रविवारी केलेल्या घोषणेमध्ये गॅस पाईपलाइनचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूरपासून बिहारमधील बांकापर्यंत नवीन गॅस लाईन आणि एलपीजी बोल्टींग प्रकल्प उभारण्यात येणार. त्याचप्रमाणे पूर्व चंपारणमधील हरीसिद्धी येथेही इंधन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन रविवारी मोदींनी केलं.

केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये बिहारसाठी १६ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार आहे. केंद्राकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमध्ये एलपीजी गॅस पाईपलाइन्स, एलपीजी बोल्टींग प्लॅन्ट, नमामि गंगे प्रकल्पाअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प, पाटबंधारे योजना, नदीविकास प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग, रेल्वेचे पूल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विजपुरवठ्यासंदर्भातील प्रकल्प, हायवे प्रकल्पांसंदर्भातील घोषणा, नवीन उड्डाणपुलांसंदर्भातील घोषणा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. या घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील जनतेशी संवादही साधणार आहेत.

“केंद्राकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांची एकूण रक्कम ही १६ हजार कोटींपेक्षा अधिक असणार आहे. करोनाच्या कालावधीमध्ये विकास कामांना गती देण्यासाठी आणि सर्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी हे प्रकल्प राबवले जाणार आहे,” असं सुत्रांनी स्पष्ट केलं. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांआधीच एनडीएत फूट पडली आहे. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने (एलजेपी) संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच बिहारमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. एलजेपीच्या सदस्यांच्या माहितीनुसार, बिहारमधील करोना संसर्गाची परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती यामुळे नितीशकुमार यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका होऊ नयेत अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, चिराग पासवान आणि नितीशकुमार या दोन्ही नेत्यांमध्ये वाद असून या दोघांनी अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळेच ही निवडणूक नितीशकुमार यांच्यासाठी अवघड ठरणार आहे.