पाकिस्तानातील ‘२६-११’ खटला वेगाने चालवण्याची मोदींकडून समज

आजचा भारत दहशतवादाशी नव्या धोरणानुसार आणि नव्या मार्गांनी लढत आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. 

मुंबईवरील २६-११च्या हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकत नाही, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्या हल्ल्याच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त व्यक्त केली. पाकिस्तानने २६-११च्या हल्ल्यासंदर्भातील खटला वेगाने आणि क्षमतेने चालवावा, असे त्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही बजावण्यात आले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने २६-११च्या हल्ल्यासंदर्भात शुक्रवारी एक लघू ध्वनिचित्रफीत प्रसारित केली आहे. त्यातील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. ‘‘आजचा भारत दहशतवादाशी नव्या धोरणानुसार आणि नव्या मार्गांनी लढत आहे,’’ असेही मोदी यांनी म्हटले आहे. 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनात मुंबईवरील हल्ला प्रकरणाची सुनावणी वेगाने करण्यात यावी, या भारताच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच आपल्या नियंत्रणाखालील भूभाग भारताविरोधातील दहशतवादी कारवायांसाठी वापरू न देण्याचा शब्द पाकिस्तानने पाळावा, असेही बजावण्यात आले आहे. २६-११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात आखण्यात आला, तेथूनच तो अमलात आणला गेला, असेही भारताने या निवेदनात स्पष्ट केले आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आणि शहीद झालेल्या अनेक शूर पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकत नाही. आजचा भारत नवे धोरण आणि नव्या मार्गांनी दहशतवादाशी लढत आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्विटरवर प्रसारित केलेल्या ध्वनिचित्रफितीमधील भाषणात मोदी यांनी म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आणि शहीद झालेल्या अनेक शूर पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना या हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकत नाही.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi warned of speeding up the 26 11 trial in pakistan abn