देशात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून लाखाच्या घरात करोनाबाधित आढळून येत असून, हजारांच्या संख्येत रूग्णांचे मृत्यू होत आहेत. केंद्र शासनाकडून करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असूनही रूग्ण संख्येतील वाढ थांबत नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शनिवार) रात्री ८ वाजता एक महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत मोदी विविध विविध मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या अगोदर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्याबरोबर बैठक घेतलेली आहे.

पंतप्रधान मोदी करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि देशातील लसीकरण मोहिमेबद्दल या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींनी नुकतीच आरोग्य, रस्ते परिवहन मंत्रालयासह अन्य मंत्रालये आणि विभागांशी चर्चा केलेली आहे.

भारताची वाटचाल लस निर्यातदार देशाकडून आयातदार देशाकडे

करोना साथ सुरू झाल्यापासून विविध देशांना लस निर्यात करणारा भारत आता कोविड १९ प्रतिबंधक लस आयात करणारा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा मोठा देश ठरला आहे. भारताने आतापर्यंत लाखो मात्रांची निर्यात केली आहे. भारतात करोनाची दुसरी लाट आल्यापासून सरकारने परदेशातील लशी आयात करण्यास परवानगी देण्याचे धोरण हाती घेतले असून स्पुटनिक या रशियाच्या लशीची आयात करण्यास परवानगी दिली आहे. रशियाच्या स्पुटनिक या लशीची आयात याच महिन्यात सुरू होत असून त्याचा १२५ दशलक्ष लोकांना लाभ होणार आहे.