PM Narendra Modi India Japan Economic Forum: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-जपान आर्थिक शिखर परिषदेतील भाषणाने त्यांच्या जपान दौऱ्याची सुरुवात केली. जपान आणि भारताबाबत बोलताना ते म्हणाले की, “भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. मेट्रो रेल्वेपासून उत्पादनापर्यंत, सेमीकंडक्टरपासून स्टार्टअपपर्यंत, जपानी कंपन्यांनी भारतात ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.” यावेळी पंतप्रधान मोदींनी जपानी उद्योगांना ‘मेक इन इंडियाचे’ आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतात राजकीय स्थिरता, आर्थिक स्थिरता, धोरणांमध्ये पारदर्शकता आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
भारत-जपान शिखर परिषदेत देशाच्या विकासावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी, आमच्या संसदेने एक नवीन आणि सरलीकृत कर व्यवस्था मंजूर केली आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्रांनंतर, आम्ही अणुऊर्जा क्षेत्र देखील खाजगी क्षेत्रासाठी खुले करत आहोत. भारतातील या बदलामागे सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचा आमचा दृष्टिकोन आहे.”
ते पुढे म्हणाले की, “जग फक्त भारताकडे पाहत नाही, तर ते भारतावर अवलंबून आहे. गेल्या दशकात, भारताने पुढच्या पिढीतील गतिशीलता आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आमच्या बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे. जपानच्या सहकार्याने, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम सुरू आहे.”
“एकत्रितपणे, आपण ग्लोबल साऊथच्या, विशेषतः आफ्रिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. मी तुम्हाला आग्रह करतो की, तुम्ही भारतात या आणि जगासाठी निर्मिती करा. (मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड) सुझुकी’ आणि ‘डायकिन’च्या सक्सेस स्टोरीज तुमच्याही सक्सेस स्टोरीज बनू शकतात”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी नवी दिल्लीहून टोकियोला रवाना झाले होते. ते शुक्रवारी टोकियोत दाखल झाले. ते १ सप्टेंबरपर्यंत जपानमध्ये असणार आहेत. त्यानंतर ते चीनला रवाना होतील. जपान दौऱ्याचा उद्देश जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळजवळ सात वर्षांनी जपानला भेट देत आहेत. त्यांचा दौरा पूर्णपणे द्विपक्षीय अजेंड्यावर आधारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याबद्दल गेल्या मंगळवारी माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले होते की, यामुळे दोन्ही देशांतील सहकार्याचे नवे मार्ग उघडतील आणि इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी सामायिक वचनबद्धता आणखी भक्कम होईल.