“ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेसोबत संबंध मजबूत होणार”; अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी मोदींची ग्वाही

२४ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात प्रथमच द्विपक्षीय बैठक होत असून त्यात व्यापार, गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे

PM Narendra Modi, PM Modi in USA today
(फोटो सौजन्य- ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये प्रथमच द्विपक्षीय बैठक होत असून त्यात व्यापार, गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या बहुप्रतिक्षित अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी आणि परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर चर्चा करणार आहेत. याआधी त्यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या प्रमुखांसोबत भेट घेऊन त्यांच्यासोबत संबंध आणखी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी हे बुधवारी अमेरिकेला रवाना झाले असून ते रविवारी परतणार आहेत. “मी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांच्यासह वैयक्तिकरित्या क्वॉड लीडर समिटमध्ये सहभागी होईन. या वर्षी मार्चमध्ये आमच्या शिखर परिषदेच्या निकालांचा आढावा घेऊन आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी शिखर परिषद आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील गुंतवणूकींसाठी प्राधान्यक्रम ओळखण्याची संधी मिळणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

“मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांना भेटून त्यांच्या देशांशी मजबूत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेईन आणि प्रादेशिक आणि जागतिक समस्यांवर आमचे आदान -प्रदान चालू ठेवू,” असेही मोदींनी म्हटले आहे.

मोदी-बायडेन भेटीत मूलतत्त्ववाद तसेच दहशतवादाचा मुकाबला यासह प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानातील घडामोडीही या बैठकीत चर्चेचा विषय ठरतील. अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही मोदी यांची चर्चा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi departs from new delhi for a 3 day visit to us abn

ताज्या बातम्या