पीटीआय, निकोसिया

‘पश्चिम आशिया आणि युरोपमधील संघर्षावर चिंता व्यक्त करून हा काळ युद्धाचा नाही, असे आम्हा दोघांनाही वाटते,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिास्तोदुलिडीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष ख्रिास्तोदुलिडीस यांच्यात विविध विषयांवर दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. मोदी म्हणाले, ‘पश्चिम आशिया आणि युरोपमधील संघर्षाचे परिणाम केवळ त्या प्रदेशापुरते मर्यादित नाहीत. आम्हा दोघांनाही वाटते, की हा काळ युद्धाचा नाही. चर्चेतून मार्ग काढणे आणि स्थिरता आणणे ही आजची गरज आहे. भारत-सायप्रस संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू करण्यासाठी आताची माझी भेट ही सुवर्णसंधी आहे.’

भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था’

‘भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था लवकरच होईल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. लिमासोल या शहरात उद्याोजकांच्या ‘राउंडटेबल’मध्ये ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘जगामध्ये नव्याने उदयास येणाऱ्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थाल असलेल्या देशांत भारत आहे. भारताच्या नागरी उड्डाण, जहाजबांधणी, डिजिटल पेमेंट, हरितविकास क्षेत्रांतील वाढीमुळे सायप्रसमधील कंपन्यांना मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.’

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस ३ ऑफ सायप्रस’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रसचे पहिले अध्यक्ष आर्कबिशप मकारिओस ३ यांच्या नावावरून हा सन्मान दिला जातो. मोदी म्हणाले, ‘हा सन्मान भारतातील १.४ अब्ज जनतेला समर्पित करतो. भारत-सायप्रस यांच्यातील विश्वासार्ह मैत्रीचा हा सन्मान आहे. येणाऱ्या काळात आपल्यातील सक्रिय भागीदारी नवी उंची गाठेल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान ‘जी७’ बैठकीसाठी कॅनडाला रवाना

सायप्रसचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी कॅनडाला रवाना झाले. मंगळवारी ते अल्बर्टातील कनानास्किस येथे होणाऱ्या ५१व्या ‘जी-७’ शिखर परिषदेत सहभागी होतील. तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी निमंत्रण दिले असल्याने सायप्रसहून ते कॅनडाला रवाना झाले. मंगळवार आणि बुधवारी ‘जी-७’ शिखर परिषदेत होणार असून सलग सहाव्यांदा मोदी त्यात सहभागी होणार आहेत.