Narendra Modi on Sudi Arabia Bus and Tanker Accident Collision : सौदी अरबमधून एका भीषण अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. भारतीय प्रवाशांना घेऊन मक्काहून मदिनाला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेत ४३ भारतीय हज यात्रेकरुंचा होरपळून मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १.३० वाजता मुफ्रीहाट स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. बस व डिझेल टँकरच्या धडकेमुळे टँकरमधील डिझेल पेटलं आणि त्यातून झालेल्या स्फोटात बसमधील ४३ यात्रेकरुंचा होरपळून मृत्यू झाला आहे.

बसचा चालक या भीषण अपघातातून बचावला असून त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. मृत भारतीय प्रवाशांपैकी अनेक जण हे तेलंगणामधील हैदराबाद शहरातील रहिवासी होते. दरम्यान, या घटनेवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.

पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की “मदिना येथे भारतीय नागरिकांशी संबंधित झालेल्या दुर्घटनेचं वृत्त ऐकून मला खूप दुःख झालं आहे. ज्यांनी आपल्या नातेवाईकांना या दुर्घटनेत गमावलं आहे त्या सर्व कुटुंबांबाबत मी सहवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत ते त्वरित बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. रियादस्थित भारतीय दूतावास व जेद्दाह येथील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना सर्व प्रकारे मदत करत आहेत. आपले अधिकारी सौदी अरबमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांचं या स्थितीवर लक्ष आहे.”

भीषण अपघात

टँकरमध्ये डिझेल असल्यामुळे अपघातानंतर टँकर व बसने पेट घेतला. ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात काही प्रवासी होरपळले आहेत. त्यांच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार चालू आहेत. परंतु, जखमींपैकी अनेकजण मोठ्या प्रमाणात होरपळले असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन व आपत्कालीन मदत पथकं ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य चालू केलं.

केंद्र व तेलंगणा सरकारची हेल्पलाइन नंबर जारी

पीडित कुटुंबांना माहिती व मदत पुरवता यावी यासाठी तेलंगणा सचिवालयाने एक नियंत्रण कक्ष सुरू केला असून 7997959754, 9912919545 हे दोन हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. तर, भारताच्या वाणिज्य दूतावासाने देखील २४X७ नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. वाणिज्य दूतावासाने 8002440003 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे.