Pm Narendra Modi On Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. खरं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून चर्चेत आहेत. ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंत जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं आहे. याचा फटका अनेक देशांना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर देखील २५ टक्के टॅरिफ लादलं.

त्यानंतर पुन्हा ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. ट्रम्प प्रशासनाचं भारतावरील अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता भारतावरील एकूण आयातशुल्क ५० टक्के होणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

‘कितीही दबाव आला तरी भारत आपल्या भूमिकेबाबत ठाम राहिल आणि कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करण्याची ताकद वाढवत राहू’, असं सूचक भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मोदींनी हे विधान केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“आज जगात प्रत्येकजण आर्थिक हितसंबंधांवर आधारित राजकारण करण्यात व्यस्त आहे. मात्र, अहमदाबादच्या या भूमीवरून सांगतो की, मी माझ्या लहान उद्योजकांना, माझ्या लहान दुकानदार बंधू-भगिनींना, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना, माझ्या पशुपालक बंधू-भगिनींना सांगतो, माझ्या देशातील लहान उद्योजक असो किंवा शेतकरी असोत, प्रत्येकासाठी मी तुम्हाला वचन देतो, माझ्यासाठी तुमचं हित सर्वोपरी आहे. माझं सरकार कधीही लहान उद्योजकांच, शेतकरी आणि पशुपालकांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. कितीही दबाव आला तरी आपण सहन करण्याची आपली ताकद वाढवत राहू”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफबाबत भारत काय भूमिका घेणार?

रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागलेलं आहे. हे अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून भारतावर लागू होणार आहे. त्यामुळे या संदर्भात भारताची भूमिका काय असणार? यावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने आता मंगळवारी (२६ ऑगस्ट) पंतप्रधान कार्यालयाने एक उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने एका वृत्तात दिली आहे.

वृत्तानुसार, अमेरिकेत भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क आकारणीचा सामना करणाऱ्या भारतीय निर्यातदारांसाठी उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने २६ ऑगस्ट रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षेखाली ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणता मोठा निर्णय घेणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.