पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले आहे. जम्मू काश्मीरमधील नशरी ते चेनानी असा हा बोगदा तयार करण्यात आला असून या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी झाले आहे. द्रुतगती मार्गावरील या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. चार वर्षांच्या विक्रमी वेळेत देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जम्मू काश्मीरमधील रस्ते आणि लोहमार्गाचा विकास करण्यावर केंद्र सरकारकडून भर देण्यात आला आहे. जम्मू ते श्रीनगरला जोडण्यासाठी नशरी ते चेनानी असा बोगदा तयार करण्यात आला आहे. ९.२८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरला आहे. पाच वर्षांची अथक मेहनत आणि तब्बल ३,७०० कोटी रुपये खर्च करुन या बोगद्याचे काम मार्गी लागले. या बोगद्यामुळे दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होईल.

उधमपूरमध्ये तयार करण्यात आलेल्या बोगद्यासाठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यामध्ये अनेक अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा करण्यात असून त्या सर्व एकाच सॉफ्टवेअरवर काम करणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘नशरी ते चेनानी बोगद्यामुळे जम्मू काश्मीरचे भाग्यच पालटेल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘नशरी ते चेनानी बोगद्यामुळे प्रवासासाठी आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचेल. यासोबतच हा बोगदा सर्व प्रकारच्या मोसमांमध्ये वाहतुकीसाठी सुरु असेल. त्यामुळे बर्फवृष्टी झाल्यावर बंद होणाऱ्या द्रुतगती मार्गाला हा बोगदा पर्याय ठरेल. त्यामुळे राज्यातील व्यापार वाढून महसुलात वाढ होईल. यासोबतच पर्यटनदेखील वाढेल,’ असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले.