जी-७ परिषदेसाठी परदेश दौऱ्यावर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नव्हते. दरम्यान, हा दौरा आटोपून आज भारतात परतल्यानंतर पंतप्रधानांनी जेटलींच्या कैलाश कॉलनी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
Delhi: Prime Minister Narendra Modi meets the family of late former Union Finance Minister #ArunJaitley at his residence. pic.twitter.com/cx0hRYYcfe
— ANI (@ANI) August 27, 2019
अरुण जेटलींचे निधन झाले त्यावेळी पंतप्रधान बहरीनमध्ये होते. त्यावेळी त्यांनी जेटलींच्या कुटुंबीयांशी फोनवरुन संवाद साधत त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी जेटलींचे पुत्र रोहन यांनी मोदींशी बोलताना देशाच्या कामासाठी तुम्ही परदेश दौऱ्यावर गेला आहात, त्यामुळे दौरा अर्धवट सोडून भारतात परतण्याची घाई करु नका, अशी विनंती केली होती.
दरम्यान, मोदींनी बहरीनमध्ये भारतीय समुदयाला संबोधित करताना जेटलींच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते. त्यांनी म्हटले होते, “मी भलेही येथे आपल्याशी बोलत असेन, देश जन्माष्ठमीचा उत्सवात दंग आहे. मात्र, मी माझ्या मनात मोठे दुःख दाबून ठेवले आहे. ज्या मित्रासोबत मी सार्वजनिक जीवनात आणि राजकीय प्रवासात पावलांसोबत पावले टाकत चाललो, प्रत्येकवेळी एकमेकांशी जोडलो गेलो होतो. स्वप्न रंगवताना आणि ती निभावताना ज्यांने मला साथ दिली त्या मित्राने अरुण जेटली यांनी आज आपला देह ठेवला. मी कल्पना करु शकत नाही की मी इथे आहे आणि माझा मित्र जग सोडून गेला आहे.”
शनिवार, २४ ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांचे दुपारी १२.०७ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी रविवारी दुपारी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.