तरुण गोगोई यांचा आरोप
पनामा घोटाळ्यात सहभाग असलेल्यांविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी कारवाई करीत नसल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला असून यापैकी काही जणांचे मोदी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे म्हटले आहे.
पनामा घोटाळ्यातील अनेकांशी मोदी यांचे निकटचे संबंध असल्याने ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाहीत, असे गोगोई यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. सर्व भ्रष्ट लोकांसाठी आणि साठेबाजांसाठी भाजप हा पक्ष सुरक्षित नंदनवन आहे. एखाद्याने भाजपमध्ये प्रवेश केला, की त्यांचे सर्व गुन्हे माफ होतात, असेही गोगोई म्हणाले.
भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास १९५१ हे वर्ष आसाम कराराच्या अंमलबजावणीसाठी आधारभूत वर्ष धरले जाईल, असे हिमंत शर्मा हे माजी मंत्री सांगत आहेत, मात्र त्यामुळे सुटलेला हा प्रश्न पुन्हा चिघळेल आणि त्यामुळे जातीय सलोख्याला बाधा निर्माण होईल, असे गोगोई म्हणाले. आम्ही आसाम करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, मात्र १९५१ हे आधारभूत वर्ष मानणार नाही, असे ते म्हणाले.
आपण मुलाची कारकीर्द विकसित करीत असल्याचा आरोप भाजप करते, मात्र राज्यातील सर्व विद्यापीठे, पूल आणि रस्ते केवळ आपल्या मुलासाठीच बांधण्यात आले का, आपला मुलगा खासदार झाला आणि त्याने आसामच्या जनतेसाठी आवाज उठविला तर त्यामध्ये गैर काय, असा सवाल गोगोई यांनी केला.