पंतप्रधान मोदी यांची स्वयंघोषित गोरक्षकांना समज.. तरीही झारखंडमध्ये तरुणाची हत्या

गोरक्षणाच्या नावाखाली बेफाम झुंडींनी एखाद्यावर संशय घेत त्याची थेट हत्याच करण्याच्या घटना वाढीस लागल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावरील आपले मौन गुरुवारी महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमात सोडले. ‘गोरक्षणाच्या नावाखाली मनुष्यहत्या करणे मुळीच स्वीकारार्ह नसून, अशा रीतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही’, अशा शब्दांत मोदी यांनी स्वयंघोषित गोरक्षकांना समज दिली. मात्र, मोदी यांनी ही समज देऊन काही तास उलटण्याच्या आतच झारखंडमध्ये गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. तसाच निषेधाचा सूर गुरुवारीही त्यांच्या भाषणात होता. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धार्मिक विद्वेषातून हरयाणातील १५ वर्षीय जुनैद खानची काही स्वयंघोषित गोरक्षकांनी नुकतीच हत्या केली. त्याच्या निषेधार्थ बुधवारी देशभर ‘नॉट इन माय नेम’ आंदोलनही झाले. या सगळ्याचा संदर्भ मोदी यांच्या बोलण्यास होता. मात्र त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम स्वयंघोषित गोरक्षकांवर झालेला नसल्याचे झारखंडमधील एका घटनेने काही तासांतच स्पष्ट झाले. झारखंडमधील रामगड जिल्ह्य़ात असगर अन्सारी या तरुणाची गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केली. असगर हा त्याच्या गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून बेभान जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. मात्र, लहान मुलांचे अपहरण व हत्येच्या प्रकरणात असगरवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गोमांसाची तस्करी करणाऱ्या काहीजणांनी ही हत्या केली आहे, असे पोलिसांतील काही जणांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातील कार्यक्रमात मोदी यांनी स्वयंघोषित गोरक्षांना चार शब्द सुनावले. ‘गायींचे रक्षण करण्याच्या नावाखाली मनुष्यहत्या कदापी स्वीकारार्ह नसेल. आपला देश अहिंसेची कास धरणारा आहे. हिंसा हे कुठल्याही प्रश्नाला उत्तर असू शकत नाही’, असे म्हणत, ‘महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोभक्तीचा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे’, अशी पुस्ती मोदी यांनी जोडली. ‘महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्याइतकी गोभक्ती, व गोरक्षण अन्य कुणी केलेले नाही. याबाबत त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आपल्याला जावे लागेल’, असा मुद्दा त्यांनी मांडला. ‘गायींचे रक्षण कसे करावे, याबाबत आपल्या राज्यघटनेनेही मार्गदर्शन केले आहे. पण गोरक्षणाचा कैवार घेतला म्हणजे एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार मिळतो? याला गोरक्षा म्हणायचे?’ असे प्रश्न त्यांनी केले.

‘या संदर्भात जे भोवताली चालले आहे ते अतिशय दुखदायी, वेदनादायी आहे. त्या भावनांना आज मी मोकळी वाट करून देत आहे. किडय़ामुंग्यांपासून भटके श्वान, जलचर यांना खाऊपिऊ घालण्याची आपली परंपरा आहे. महात्मा गांधी यांनी आपल्याला अहिंसा शिकवली आहे. मग आज आपल्याला हे काय झाले आहे?’, असे उद्गार मोदी यांनी काढले.

‘एखाद्या ठिकाणी अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावला तर त्याचे नातेवाईक रुग्णालयाला आग लावतात, डॉक्टरला मारहाण करतात. अपघात हा अपघातच असतो, एखादा अपघातात दगावला अथवा जखमी झाला तर जमाव वाहनांची जाळपोळ करतो, हिंसाचार घडवितो’, असे नमूद करीत वाढत्या झुंडशाहीकडे मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले.

तथाकथित गोरक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले असले, तरी निवडणुकीपूर्वी या मुद्दय़ावर केलेल्या वक्तव्यांमध्ये विसंवाद दिसून येतो. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन कॉँग्रेस सरकारच्या मांस निर्यातीच्या धोरणाला विरोध केला होता. त्यातून एक प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार होता.

ऑगस्ट २०१६

‘माय गव्हर्मेन्ट’ मोहिमेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोरक्षकांचे गट हे बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचे सांगितले. या गोरक्षणाच्या नावाखाली दुकाने थाटली असून, त्याचा संताप येतो. असे लोक गोरक्षा करण्याच्या नावाखाली रात्री समाजविरोधी कारवाया करतात आणि सकाळी गोरक्षक असल्याचे सोंग घेतात. असे वक्तव्य केले.

एप्रिल २०१४

बिहारमधील नवादा या यादवबहुल मतदारसंघात त्यांनी केंद्र सरकारच्या कत्तलखान्यांना अनुदान देण्याच्या योजनेवर टीका केली होती.  ‘‘पटना येथे मी द्वारकानगरीत आलो आहे आणि द्वारकेतील यादवांशी माझे थेट संबंध आहेत. त्यामुळे यादवांबाबत मला आपुलकी असणे स्वाभाविक आहे. मात्र गोपालन करणाऱ्यांचे नेते कुणाशी आघाडी करत आहेत? जनावरांची कत्तल करण्यात ज्यांना समाधान मिळते अशांबरोबर कोण जात आहे त्याचा विचार करा? असा सवाल विरोधकांवर टीका करताना  त्यांनी केला होता.

ऑक्टोबर २०१३

केंद्र सरकारच्या मांस व्यापाराच्या योजनेवर मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना टीका केली होती. ‘‘केंद्र सरकारला भारतात ‘गुलाबी क्रांती’ आणायची असून जगभरात मांस निर्यात वाढवायची आहे. यावर्षी सरकारने गोमांस निर्यातीत भारत जगात पहिला असल्याचे घोषित केले. कुठल्या गोष्टींचा आपण गर्व करीत आहोत?  तुम्ही हे सगळे होत असताना शांत राहून कसे सहन करीत आहात हे मला अनाकलनीय आहे.’’

मे २०१२

उदयपूर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बोलताना मोदी यांनी गोरक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख के ला होता. त्याच वेळी आजची स्थिती काय? सर्वोच्च न्यायालयाने देशात गोरक्षणासाठी कायदा आणायला हवा असे सांगितले, मात्र केंद्र सरकार मतांच्या राजकारणांसाठी गोरक्षणाचा कायदा आणत नाही, असा आरोप मोदींनी केला होता.

गोरक्षण अथवा गोभक्तीच्या नावाखाली हिंसाचार घडविणे हे राष्ट्रपिता म. गांधीजी यांच्या शिकवणीच्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारातून काहीही साध्य होणार नाही. हिंसाचाराने कधीही प्रश्न सुटलेले नाहीत अथवा सुटणारही नाहीत, त्यामुळे सर्वानी एकत्रित काम करून म. गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करू या.  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मोठमोठय़ा घोषणा करतात, मात्र त्यांची अंमलबजावणी सोयीस्करपणे विसरतात. गोरक्षणाच्या बाबतीत हिंसाचार सहन करणार नाही, असे मोदी म्हणत आहेत. मात्र समाजातल्या असल्या हिंसाचारी लोकांना भाजप आणि संघच पाठिंबा देत आहे, म्हणूनच गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठार करणाऱ्यांची हिंमत वाढते. भाजपची ही नीती म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे अशी आहे.  असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एमआयएम