देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गोव्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोव्यात एकूण ६०० कोटींच्या वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन केलं. यामध्ये ऐतिहासिक अॅग्वाडा किल्ल्याच्या नुतनीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. दरम्यान, या दौऱ्यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिलेल्या एका संदर्भाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गोव्याच्या इतिहासाशी संबंधित या मुद्द्यावरून नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भावर आक्षेप घेतला आहे. तसेच, हा संदर्भ चुकीचा असून इतिहासात वेगळे दाखले दिसत असल्याचं देखील नेटिझन्सनी लक्षात आणून दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
गोव्यातल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. यावेळी त्यांनी गोव्याच्या इतिहासाचे अनेक दाखले दिले. यावेळी बोलताना “जेव्हा भारताच्या बहुतांश भागावर मुघलांचा अंमल होता, तेव्हा गोवा पोर्तुगीज शासनाच्या अधिपत्याखाली आला. पण शेकडो वर्षांनंतर देखील ना गोवा त्याच्या भारतीयत्वाला विसरलाय, ना भारत त्याच्या गोव्याला विसरलाय”, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या याच संदर्भावर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप घेतला आहे. गोव्यावरील पोर्तुगीजांच्या अंमलाविषयी मोदींनी सांगितलेली माहिती चुकीची असल्याचा दावा अनेक नेटिझन्सनी केला आहे.
काय आहे ही माहिती?
नेटिझन्सनी मोदींच्या या विधानावर केलेल्या ट्वीटमध्ये आपला आक्षेप नोंदवला आहे. गोवा १५०५ ते १५१० च्या दरम्यान पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला. स्थानिकांशी युद्ध करून पोर्तुगीजांनी यादरम्यान गोव्यावर आपला अंमल प्रस्थापित केला. पण मुघल मात्र भारतात १५२६ ते २८ दरम्यान आले. त्यामुळे भारतात मुघलांचं राज्य असताना गोवा पोर्तुगीज शासनाच्या अधिपत्याखाली आल्याचा पंतप्रधानांचा संदर्भ चुकीचा असल्याचं या ट्वीट्समध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक अभ्यासकांकडून इतिहासाचे दाखले दिले जात आहेत.