PM Narendra Modi Independence Day Speech remark on Donald Trump : भारत आज (१५ ऑगस्ट) ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी तब्बल १०३ मिनिटांचं भाषण केलं. या भाषणातून त्यांनी अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या. पहिलीच खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार असल्याची, जीएसटीमध्ये कपात करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. तसेच त्यानी पाकिस्तानचा देखील खरपूस समाचार घेतला. यासह त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नामोल्लेख टाळत अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं नाव न घेता त्यांना संदेश दिला आहे. ते म्हणाले, “आपल्याला (देशातील नागरिकांना) आपली पूर्ण ऊर्जा पणाला लावून आपली रेघ (रेषा) लांब करायची आहे. आपण आपली रेघ लांब केली तर जग आपल्याला सलाम करेल. जागतिक परिस्थिती पाहता सर्वजण स्वतःचा आर्थिक स्वार्थ पाहत असल्याचं दिसतंय. आपण कणखरपणे वैश्विक आर्थिक संकटांचा सामना करायला हवा. संकटं पाहून रडण्यापेक्षा हिंमतीने आपण आपली रेघ मोठी करुया आणि हीच काळाची गरज आहे. कोणाचाही स्वार्थ आपलं नुकसान करू शकणार नाही.”

पंतप्रधान मोदी यांचा नागरिकांना खास संदेश

भारताचे पंतप्रधान म्हणाले, “आता आपल्याला अनेक नव्या ताकदींचा सामना करावा लागणार आहे. अलीकडच्या काळात आपण अनेक बदल पाहिले आहेत. आपल्या देशाची ताकद वाढवण्यासाठी आपण स्वदेशीचा वापर वाढवूया. आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू आपण खरेदी केल्या तर त्यातून भारत समृद्ध होईल. देशातील व्यापाऱ्यांनी देखील स्वदेशी वस्तू विकल्या पाहिजेत आणि विकत घेतल्या पाहिजेत. तसे फलकही आपल्या दुकानांबाहेर लावले पाहिजेत.”

“अलीकडच्या काळात विमा कंपन्यांमध्ये, विद्यापीठांमध्ये काही बदल करण्यात आले. ४० हजारांहून अधिक नियम रद्द करण्यात आले, १५०० हून अधिक जुने कायदे नष्ट करण्यात आले. डझनभर कायदे अधिक सुरळीत केले. काही कायद्यांमध्ये बदल केले आहेत.”

दाम कम, दम ज्यादा! काय आहे मोदी यांचा नागरिकांसाठीचा मंत्र?

दरम्यान, मोदी यांनी भारताने उच्च गुणवत्ता असलेल्या आणि परवडणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. यासाठी ‘दाम कम, दम ज्यादा’ हा मंत्र त्यांनी यावेळी सांगितला.