ज्याच्याकडे ज्ञान आणि कौशल्य आहे त्याला आपल्या उपजीविकेची काळजी करावी लागत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या सरदारधाम भवनाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. सक्षम व्यक्ती आपल्या प्रगतीसाठी स्वतःचं मार्ग निर्माण करतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी दूरदृश्य़ प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भर या गोष्टीवर आहे की आपलं शिक्षण कौशल्यात वाढ करणारं असावं. भविष्यात मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या कौशल्यांना मागणी असेल, भविष्यात जगात पुढे राहायला आपल्या युवकांना काय हवं असेल, राष्ट्रीय शिक्षण धोरण हे सुरूवातीपासूनच तरुणांना जागतिक आव्हांनासाठी तयार करेल.


मोदी पुढे म्हणाले,  आज स्किल इंडिया मिशन हीच देशाची प्राथमिकता असून या मिशनअंतर्गत लाखो युवकांना वेगवेगळी कौशल्यं आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे. ते आत्मनिर्भर बनत आहेत. नॅशनल अॅपरेन्टसशीप स्कीमच्या अंतर्गत युवकांना कौशल्यविकासाची संधीही मिळत आहे आणि त्यांना आर्थिक लाभही होत आहे. मानवकल्याण योजनांसह इतरही अनेक योजनांच्या माध्यमांतून गुजरात या दिशेने प्रयत्न करत आहे.