देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर टीका, आरोप प्रत्यारोप या सगळ्याला चांगलाच जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल संसदेत केलेल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यामुळे मोठा वादंगही निर्माण झाला. त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक विशेष मुलाखत एएनआय वृत्तसंस्थेकडून प्रसारीत केली जाणार आहे. या सगळ्या वादाच्या तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी आज पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर विशेष मुलाखत देणार आहेत. एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी विशेष मुलाखत देणार आहे. या मुलाखतीचे प्रक्षेपण आज रात्री ८ वाजता होणार आहे. त्यामुळे या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी काय खुलासा करणार, काँग्रेसवर काय टीका करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘ करोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्द केली. देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होता, डब्लूएचओ सल्ला देत होते, जो जिथे आहे तिथेच राहावे, असा संदेश जगभरात दिला जात होता. कारण लोकांनी प्रवास केला असता तर संसर्ग वाढला असता. मुंबईमध्ये काँग्रेसवाल्यांनी इतर लोकांना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. महाराष्ट्रावर जे तुमचे ओझे आहे ते कमी करा, तुम्ही तुमच्या राज्यात जा, करोना पसरावा, असं पाप काँग्रेसने केलं होतं. मुंबईत मोठा वाद निर्माण झाला होता. तुम्ही आमच्या लोकांना श्रमिक लोकांना अनेक अडचणीमध्ये आणलं. काँग्रेसने लोकांना तिकीटं सुद्धा काढून दिली होती, अशी टीका मोदींनी केली.

“उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोना जेवढा पसरला नव्हता, तो आणखी पसरला. करोनाच्या संकटात हे कोणते राजकारण होते? हे घाणेरेडे राजकारण किती दिवस चालणार आहे? काँग्रेसच्या या वागण्यामुळे मीच नाहीतर देश सुद्धा अडचणीत आहे. हा देश तुमचा नाही का, इतक्या मोठ्या संकटामध्ये तुम्ही असं का वागला? असे सवालही मोदींनी उपस्थित केले होते.