हिमाचल प्रदेशमध्ये एकहाती विजय मिळाल्यानंतर आज शिमल्यामध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर हेलीपॅडच्या दिशेने मोदींचा ताफा निघाला. मात्र अनाचक हा ताफा मॉल रोडवर आल्यानंतर थांबला. या अनियोजित थांब्यासाठी कारणही तसे विशेषच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा शिमल्यातील प्रसिद्ध अशा इंडियन कॉफी हाऊस समोर थांबला कारण मोदींना तेथील कॉफी प्यायची होती. हे कॉफी शॉप म्हणजे मोदींचा कॉफीचा जुना अड्डा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण मोदी स्वत: पक्ष कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तसेच पक्षासंदर्भातील इतर कामांसाठीही जेव्हा शिमल्यात येत असतं तेव्हा आवर्जून येथे थांबून कॉफीचा आस्वाद घेत असतं. ती परंपरा त्यांनी आजही जपली असचं म्हणावं लागेल.

या अचानक झालेल्या कॉफी शॉप दौऱ्याबद्दल मोदींने अगदी आपल्या ट्विटरवरूनही माहिती दिली. शिमल्यात आज इंडियन कॉफी हाऊसमध्ये कॉफी प्यायलो आणि जुन्या दिवसांची आठवण झाली. जेव्हा मी पक्षाच्या कामासंदर्भात वरचेवर शिमल्याला यायचो तेव्हासारखीच म्हणजेच २० वर्षापूर्वी सारखीच चव आहे या कॉफीची आजही अशा आशयाचे ट्विट मोदींने केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लोकांची जमलेली गर्दी आणि कॉफीचा आस्वाद घेतानाचे फोटोही ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये मोदींने चॉकलेटी रंगाची हिमाचल प्रदेशातील लोकं वापरतात तशी टोपी घातलेली दिसते.

यावेळी मोदींनी स्थानिकांशी गप्पा मारल्या तसेच काहीजणांना सेल्फीसाठी पोजही दिली. मात्र अचानक मोदींचा ताफा थांबल्याने सुरक्षारक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.

इंडियन कॉफी हाऊस बद्दल

इंडियन कॉफी हाऊस हे शिमल्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. शिमल्याला जाणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या कॉफी शॉपला भेट द्यावी असं अनेकजण सांगतात. येथील कॉफीची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते असं अनेकजण सांगतात. त्यामुळेच हे कॉफी शॉप पर्यटकांबरोबरच स्थानिकांमध्येही लोकप्रिय आहे.

लोक येतात आणि जातात मात्र येथील कॉफीचा दरवळ कधीच कमी होत नाही असं ‘द हिल पोस्ट’ या वेबसाईटवरील एका लेखामध्ये या कॅफे शॉपबद्दल लिहीताना म्हटले आहे. चॅटरुम, गॉसिप, घोटाळे, काद्यासंदर्भातील गप्पा, अफवा, गोष्टी, राजकारण, वादविवाद, चर्चा असं सर्व सर्व काही करण्याचे शिमल्यातील लोकप्रिय ठिकाण म्हणजे हे जुने इंडियन कॉफी हाऊस. शिमल्यातील अनेकजणांसाठी भेटण्याची जागा असणारे हे मॉल रोडवरील इंडियन कॉफी हाऊस १९५७ साली सुरु झाल्याचेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.