PM Narendra Modi Remark on Donald Trump Additional Tariff : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं आहे. तसेच अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून हे अतिरिक्त आयात शुल्क देखील लागू केलं जाईल. अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्योरिटी विभागाने यासंदर्भातील नोटीस जारी केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “रशियन सरकारकडून येणाऱ्या धमक्यांवर प्रतिक्रिया म्हणून हे आयात शुल्क लागू करण्यात आलं आहे. सरकारच्या नव्या धोरणाचा भाग म्हणून भारताला लक्ष्य केलं आहे.”
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लादलं आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या रागातून ते शुल्क दुप्पट केलं आहे. भारतावरील ही दंडात्मक कारवाई असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
अमेरिकेच्या टॅरिफबाबत नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, म्हणजेच दंडात्मक टॅरिफ लागू होण्याच्या दोन दिवस आधी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भारत कोणत्याही आर्थिक दबावाला समर्थपणे तोंड देईल. कारण, भारत कोणत्याही संकटकाळात टिकून राहू शकतो, पुन्हा उभा राहू शकतो. कितीही दबाव असला तरी आम्ही त्याला तोंड देण्यास सक्षम आहे. सकंटकाळातही आम्ही आमची ताकद वाढवत राहू.” अहमदाबादमधील निकोल येथील एका सार्वजनिक सभेत ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी स्पष्ट केलं की “सरकार छोटे उद्योजक, शेतकरी व पशूपालकांचं नुकसान होऊ देणार नाही.”
अमेरिकेच्या टॅरिफवर अप्रत्यक्ष टीका करताना मोदी म्हणाले, “आजच्या या जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण केलं जातंय. सगळेजण आपापाला विचार करत आहेत आणि आम्ही ते पाहतोय.”
छोटे उद्योजक, शेतकरी व पशूपालकांचं हित माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं : मोदी
पंतप्रधान म्हणाले, “अहमदाबादच्या मातीत उभा राहून मी तुम्हाला सांगू इच्छितो, महात्मा गांधींच्या भूमीतून तुम्हाला वचन देतो की लहान उद्योजक, दुकानदार, शेतकरी व पशूपालकांचं हित माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. कितीही दबाव आला तरी आपण त्याचा सामना करू. संकटकाळात आपली ताकद वाढवत राहू.”