पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान होण्यासाठी सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असल्याचा टोला लगावला आहे. 20 ते 25 जागा लढवत असणाऱ्या पक्षाचा नेताही पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहत आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

‘प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचं आहे असं दिसत आहे. कोणताही पक्ष जो 20 ते 25 जागांवर लढत आहे तो पंतप्रधान पदावर दावा करत आहे. सगळेच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा अस्त होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे असंही ते म्हणाले आहेत.

‘जर दीदींकडे गुंडांची ताकद असेल तर आमच्याकडे लोकशाहीची ताकद आहे’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये योग्य पद्धतीने मतदान पार पडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानले.

‘मी कुठेतरी ममता बॅनर्जी यांनी केलेलं वक्तव्य वाचलं की, चहावाला गेल्या पाच वर्षांपासून परदेश दौरे करण्यात व्यस्त आहे. पण आज त्याच दौऱ्यांमुळे भारताची ओळख निर्माण झाली आहे’, असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आपल्या दीदी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत आहेत. जर लिलाव करत पंतप्रधान पद मिळवणं शक्य असतं, तर काँग्रेस आणि दीदी इच्छेने सहभागी झाले असते. घोटाळे करुन जे पैसे जमा केलेत त्यांच्या सहाय्याने त्यांनी पद मिळवण्याचा प्रयत्न केला असता. पण तुम्ही लिलावातून ही जागा मिळवू शकत नाही. यासाठी 130 कोटी लोकांच्या आशिर्वादाची गरज आहे’, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.