पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जुनागडमधील (गुजरात) ‘आई श्री सोनल माँ’ यांच्या जन्मशताब्दी समारंभाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले, सोनल माँ यांचं जीवन पाहिलं तर सर्वांच्या लक्षात येईल की, असं कुठलंही यूग नाही ज्या युगात या भारतभूमीवर महान आत्मे अवतरले नसतील. गुजरात आणि सौराष्ट्रची भूमी ही महान संतांची भूमी आहे. सौराष्ट्रच्या मोठ्या संत परंपरेतील श्री सोनल माँ या आधुनिक युगासाठी दीपस्तंभ होत्या. त्यांची अध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी उपदेश, तपश्चर्या आणि शिकवण कायमच आपल्या लक्षात राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सोनल माँ यांच्या व्यक्तिमत्वात एक अद्भूत दैवी गूण होता, ज्याचं लोकांना खूप आकर्षण होतं. आजही तुम्ही जुनागडमधील सोनलधामला भेट दिली तर तुम्हाला ती दैवी शक्ती अनुभवता येईल. सोनल माँ यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्यांनी समाजाचं प्रबोधनही केलं. लोकांना व्यसनापासून मुक्त केलं. व्यसनांच्या अंधारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आणि त्याच समाजात नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी सोनल माँ यांनी मोलाचं योगदान दिलं.
हे ही वाचा >> “पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याची आवश्यकता नाही”, शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना विरोध? म्हणाले, “आम्हाला खात्री आहे…”
नरेंद्र मोदी म्हणाले, सोनल माँ यांनी समाजातला अंधकार नष्ट करण्याचं काम केलं. देशाची एकता आणि अखंडतेसाठी प्रयत्न केले. देशातील एकात्मतेसाठी त्या भक्कम भींत बनून उभ्या राहिल्या. भारताची फाळणी झाली तेव्हा जुनागड तोडण्याचं षडयंत्र काहींनी रचलं होतं. तसेच जुनागड भारतापासून हिरावण्याचे प्रयत्नही चालू होते. परंतु, या सर्वांविरोधात श्री सोनल माँ चंडीप्रमाणे उभ्या राहिल्या. आता २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ते पाहून सोनल माँ खूप आनंदी होतील. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी तुमच्या घरांमध्ये श्री राम ज्योती प्रज्वलित करा. कालपासून आपण देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं आहे. देशभरातील मंदिरं स्वच्छ केली जाणार आहेत.
