पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विटरवरून राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मी करतो, असे ट्विट मोदींनी केले आहे. राहुल गांधी आज ४८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसकडून त्यांचा जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त लखनऊमध्ये शहरातील विविध रुग्णालयांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते फळांचे वाटप करणार आहेत. तर मोतीनगर येथील अनाथालयात काँग्रेस नेत्यांनी मुलांसाठी मेजवानी आयोजित केली आहे.

दरम्यान, सध्या राहुल हे सुट्टीसाठी परदेशात गेले आहेत. ते मंगळवारी त्यांच्या आजीला भेटण्यासाठी इटलीला रवाना झाले होते. इटलीला जाण्यापूर्वी राहुल यांनी स्वत:हून ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली होती. ‘आजी आणि नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मी काही दिवसांसाठी परदेशात जात आहे. त्यांच्यासोबत काही काळ राहून पुन्हा भारतात परतेन’ असे राहुल यांनी म्हटले होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यांना गावात जाऊ दिले नव्हते. शेतकरी आंदोलन चिघळत असताना राहुल गांधीही या आंदोलनात सक्रीय होऊन केंद्र सरकार आणि भाजपची कोंडी करतील अशी आशा होती. राहुल गांधी मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. मात्र हे आंदोलन सुरु असतानाच राहुल गांधी आजीला भेटायला इटलीला गेल्याने काँग्रेसची कोंडी झाली होती.  राहुल गांधी यांच्या परदेशी दौऱ्यांची वेळ ही नेहमीच वादाचा मुद्दा ठरली आहे. लोकसभेत  झालेल्या काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी सुमारे दोन महिने परदेशात होते. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते गैरहजर होते. भाजपने यावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.