पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये व्युहात्मक आणि दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी वादग्रस्त ठरणाऱया विषयांवरील धोरणाचा फेरविचार करण्याचा सल्ला चीनला दिला. सध्या चीनच्या दौऱयावर असलेल्या मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यावेळी त्यांनी चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा मुद्दा उपस्थित केला.
अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी स्टेपल्ड व्हिसा देण्याच्या कृतीबद्दल आक्षेप नोंदवत हा मुद्दाही त्यांनी चर्चेमध्ये उपस्थित केला. दोन्ही देशांनी परस्परांमधील नाजूक विषयांबद्दल संवेदनशीलता दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दोन्ही देशांमध्ये रेल्वे, खाणकाम, भूकंपशास्त्र, पर्यटन, सिस्टर सिटिज यासह शेंगडू आणि चेन्नईमध्ये वाणिज्य दूतावास उभारण्यासंदर्भात वेगवेगळ्या २४ करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. भारत आणि चीनमध्ये एकाचवेळी एवढ्या करारांवर स्वाक्षऱया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्यामध्ये झालेली चर्चा मैत्रीपूर्ण, सकारात्मक आणि रचनात्मक होती. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या आड येणाऱया विषयांसह सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली, असे मोदी यांनी चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.