वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा २३ ते २६ जुलै या कालावधीत होणार असून व्यापार करार आणि राजकीय चर्चा यांच्या माध्यमातून देशाचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात, २३ आणि २४ जुलैला पंतप्रधान मोदी ब्रिटनला जाणार आहेत. तिथे ते ऐतिहासिक भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर (एफटीए) सही करणार आहेत. या करारामुळे दोन्ही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून व्यापारासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या ९९ टक्के निर्यातींवरील शुल्क कमी होणार असून व्हिस्की आणि कार यासारख्या ब्रिटिश वस्तूंच्या भारतात आयातीवरील शुल्क कपात होणार आहे. या करारावर गेले तीन वर्षे वाटाघाटी सुरू होत्या.
ब्रिटनचा दौरा आटोपून मोदी २५ जुलैला मालदीवला जाणार आहेत. तिथे ते ६०व्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. मोहम्मद मुइझ्झू मालदीवचे अध्यक्ष झाल्यापासून मोदी यांचा हा पहिलाच मालदीव दौरा असणार आहे. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, भारत आणि चार युरोपीय देशांचा समावेश असलेल्या ‘युरोपीयन फ्री ट्रेड असोसिएशन’दरम्यान (ईएफटीए) मुक्त व्यापार कराराची १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. या कराराअंतर्गत ‘ईएफटीए’ १५ वर्षांच्या कालावधीत भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारावर दोन्ही बाजूंनी मार्च २०२४मध्ये सह्या करण्यात आल्या होत्या.
दुसरीकडे, भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटीची पाचवी फेरी पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही फेरी १४ ते १७ एप्रिलदरम्यान वॉशिंग्टनमध्ये पार पडली.