सुरेश प्रभू यांच्या ‘खराब कामगिरी’वर पंतप्रधान कार्यालय नाराज

पुढील अर्थसंकल्पात जास्त रकमेसाठी कारणे सांगावी लागतील असे म्हटले आहे.

suresh prabhu, arun jaitley, railway ministries
Suresh Prabhu And Arun jaitley : सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातांबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नाराजी व्यक्त केली आहे.

सातत्याने होत असलेल्या रेल्वे अपघातांबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात पीएमओने रेल्वेच्या कार्यप्रणालीवर नाराजी जाहीर करत मागील दोन वर्षांत ठरवलेले उद्धिष्ठ रेल्वेने पूर्ण केले नसल्याचे म्हटले आहे. डीएनए या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ३१ जानेवारी रोजी लिहिलेल्या या पत्रात पीएमओने मागील वर्षी झालेल्या रेल्वे अपघातांत २२५ लोकांना जीव गमवावा लागल्यामुळे हैराणी व्यक्त केली. त्याचबरोबर रेल्वेकडून सेवासुविधांचे आधुनिकीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. पीएमओच्या मते या क्षेत्रात रेल्वेने अद्याप काहीच केलेले नाही. पत्रात म्हटले आहे, तुम्हाला माहीत आहे की, सरकारचे पूर्ण लक्ष हे रेल्वेच्या सुविधांचे आधुनिकीकरणावर आणि विकासावर आहे. १५०० किमी रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु तुम्ही फक्त ५३१ किमी ट्रॅकचे दुहेरीकरण केल्याचे यात म्हटले आहे.
विद्युतीकरणात २००० आरकेएमचे लक्ष ठेवण्यात आले होते. फक्त १२१० किमीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे बोर्डाचे ए. के. मित्तल यांना संबोधून हे पत्र लिहिण्यात आले आहे. यात पंतप्रधान कार्यालयाने इशारा देत रेल्वेच्या पुढील अर्थसंकल्पात जास्त रकमेची तरतूद करण्यासाठी कारणे सांगावी लागतील असे म्हटले आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाने रेल्वेसाठी १,३१,००० कोटी रूपयांची मोठी तरतूद केली आहे. रेल्वेला वाहतूक, रस्ते आणि नागरी उड्डयण मंत्रालयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालय सुरक्षेसाठी केलेल्या तरतुदींचा योग्य वापर केला नसल्याचा आरोप पीएमओने केला आहे. वर्ष २०१६ मध्ये सर्वाधिक रेल्वे अपघात हे व्यस्त रेल्वे ट्रॅक्सवर फ्रॅक्चरमुळे झाले आहेत. फ्रॅक्चर रेल्वे ट्रॅक्सच्या दुरूस्तीचा दर्जा चांगला नसल्यामुळे हे अपघात झाले आहेत. रेल्वे विभागाकडून तत्परतेने काम केले जात नसल्याचा तक्रारीचा सूरही पीएमओने लिहिलेल्या पत्रात आळवला आहे. रेल्वेच्या कामगिरीवर अरूण जेटलीही नाराज असल्याचे सांगण्यात येते. जेटली हे कायम रेल्वेला सुरक्षित व चांगल्या सुविधांसाठी आधुनिकीकरण करण्यावर लक्ष देण्यास सांगत असतात, असे या वृत्तात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pmo railway minister suresh prabhu union minister arun jaitley express displeasure