वर्षभरात आठ गेंडय़ांचा बळी
आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये शिकाऱ्यांनी आणखी एका गेंडय़ास ठार करून त्याचे शिंग घेऊन गेले. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये या आठवडय़ात आणखी एका गेंडय़ाची शिकार झाल्याने वर्षभरात मारल्या गेलेल्या गेंडय़ांची संख्या आठ झाली आहे असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रौढ वयातील या गेंडय़ाचा सांगाडा मानस नॅशनल पार्कमधील भुयापारा जंगल क्षेत्रात सापडला आहे. त्याचे शिंग तोडून नेण्यात आले आहे.
एकशिंगी गेंडय़ाचे शिंग बाजारात जास्त भावाने विकले जाते त्यामुळे गेंडय़ांची शिकार होत आहे. काल रात्री किंवा आज सकाळी गेंडय़ाची शिकार झाली असावी असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. पार्कमधील प्रोजेक्ट टायगर अंतर्गत झाडांवर कॅमेरे लावले असून त्यात बंदुकधारी व्यक्तीची छबी टिपली गेली आहे. तोच शिकारी असावा असा संशय आहे. तीन वर्षांपूर्वी मानस पार्कमध्ये भूतानलगतच्या सीमेवरील भागात एकशिंगी गेंडा शिकाऱ्यांनी मारला होता.
मानस पार्क हे युनेस्कोने वारसा केंद्र म्हणून १९८५ मध्ये जाहीर केले आहे पण नंतर १९९२ मध्ये धोक्यात असलेले जागतिक वारसा ठिकाण म्हणून ते जाहीर करण्यात आले. कारण तेथील गेंडय़ांची संख्या कमी होत गेली. मानस नॅशनल पार्क हे आता २०११ मध्ये एकशिंगी गेंडय़ांसाठी धोकादायक जागतिक वारसा ठिकाणातून काढण्यात आले आहे. कारण काझिरंगा येथून काही एक शिंगी गेंडे तेथे हलवण्यात आले होते. आसाम सरकारच्या इंडियन ऱ्हाइनो व्हिजन योजनेत २०२० पर्यंत एकशिंगी गेंडय़ांची संख्या ३००० करण्याचा विचार आहे पण सध्या या योजनेत मानस नॅशनल पार्कमध्ये ३० गेंडे आहेत. १ मे रोजी शिकाऱ्यांनी काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये एका नर गेंडय़ाची शिकार केली होती.