करोना विषाणूमुळे जगभरामध्ये थैमान घातले आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या पाच हजारहून अधिक झाली आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. भारतातील करोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. करोनाबद्दल जगभरात भितीचे वातावरण आहे. याच भितीचा फायदा घेऊन अनेक अफवा पसरवल्या जात आहे. अनेकांनी तर या आपत्तीचा पैसे कमवण्यासाठी गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका ‘करोना बाबा’ला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमधील वजीरगंज पोलिसांनी अहमद सिद्दीकी नावाचा ढोंगी बाबाला अटक केली आहे. आयुर्वेदिक औषधे विकणाऱ्या आपल्या फुटपाथवरील दुकानाबाहेर अहमद सिद्दीकीने एक फलक लावला होता. यामध्ये त्याने करोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी जे लोक महागडे मास्क विकत घेऊ शकत नाही त्यांनी त्याच्याकडील तावीज विकत घ्यावे. हे तावीज बांधल्यास करोना विषाणूचा संसर्ग होत नाही असा दावा या फलकावर सिद्दीकीने केला होता. मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकाऱ्यांनी (सीएमओ) केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली आहे.

सीएमओने दिलेल्या तक्रारीनुसार सिद्दीकी हा करोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवून त्यांची फसवणूक करत त्यांच्याकडूने पैसे उकळत होता. सीएमओच्या तक्रारीनंतर वजीरगंज पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सिद्दीकीला अटक केली आहे. “जवाहर नगर येथे राहणारा अहमद सिद्दीकी याच्याविरोधात सीएमओकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अटक करण्यात आलेली व्यक्ती स्वत:ला करोना बाबा सांगून लोकांची फसवणूक करत होती अशी तक्रार सीएमओने केली होती,” अशी माहिती लखनऊचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास त्रिपाठी यांनी दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाचे ११ रुग्ण राज्यात अढळून आले आहेत. सात जण आग्रा, दोघे गाझियाबाद आणि नोएडा आणि लखनऊमध्ये प्रत्येक एक रुग्ण अढळून आला आहे. दहा जणांवर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तर एकावर लखनऊमधील केजीएमयूमध्ये उपचार घेत आहेत.