गुजरातमधील पटेल समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात एका पोलिसाकडूनच वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचे सीसीटीव्ही चित्रणात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
पटेल समाजाचे आंदोलन सुरू असताना पोलिसाने हवेत गोळीबार करून मालमत्तेचे नुकसान केल्याचेही सीसीटीव्ही चित्रणात स्पष्ट झाले आहे. आंदोलनात पोलीसच तोडफोड करत असतील, तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये फरक काय? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
वकील विराट पोपट आणि त्रिथा दवे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत २५ ऑगस्ट रोजी ४० पोलिसांनी येथील सोसायटीत प्रवेश करून वाहनांची तोडफोड केल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सीसीटीव्ही चित्रणही न्यायालयात सादर केले. याप्रकरणी सुनावणी करताना पोलिसांवर कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
पोलिसांच्या या कृत्यामुळे सामान्य जनतेत कोणता संदेश पोहोचेल? असा सवाल करताना पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. न्यायमूर्ती जे.बी. पारदिवाला यांनी पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले.