वृत्तसंस्था, इस्लामाबाद : पाकिस्तानात सत्ताधारी आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष बुधवारी विरोधकांना जाऊन मिळाल्यानंतर, आधीच अडचणीत आलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी वस्तुत: बहुमत गमावले. विरोधी पक्षांनी नॅशनल असेम्ब्लीत मांडलेल्या अविश्वास ठरावात पराभूत होण्याचे संकट खान यांच्यापुढे उभे ठाकले आहे.  पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या व सभागृहात ७ सदस्य असणाऱ्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट- पाकिस्तान (एमक्यूएम-पी) पक्षाने आपण आघाडीशी काडीमोड घेतला असल्याचे इस्लामाबादमध्ये विरोधी पक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

आपल्याला पदावरून उलथून टाकण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पंतप्रधान खान यांना ३४२ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात १७२ मतांची आवश्यकता आहे. विरोधकांना १७५ सदस्यांचे समर्थन असून पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला हवा, असे जमिअत उलेमा-इ-इस्लाम फझल (जेयूआय-एफ) चे प्रमुख मौलाना फझलुर रहमान यांनी सांगितले. ६९ वर्षांचे खान यांना पदावरून हटवल्यानंतर, पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते शहबाझ शरीफ हे पुढील पंतप्रधान होतील, असेही जाहीर करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सहिष्णुता आणि खरी लोकशाही यांच्या राजकारणाची नवी सुरुवात आम्ही करू इच्छितो’, असे एमक्यूएम-पीचे प्रमुख खालिद मकबूल सिद्दिकी यांनी पत्रकारांना सांगितले. संसदेत विरोधी पक्षांना आपला पािठबा त्यांनी जाहीर केला.  दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे बुधवारी देशाला उद्देशून करणार असलेले भाषण लांबणीवर टाकण्यात आले. त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे खासदार फैझल जावेद खान यांनी वृत्ताला दुजोरा दिला. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पीटीआयला समर्थन देणारे अनेक पक्ष आघाडीतून बाहेर पडले असून, ते खान यांच्याविरोधात मतदान करण्याची शक्यता आहे.