जद(यू)ने राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) फारकत घेतल्यानंतर बिहारमधील समीकरणे बदलून मोठय़ा प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करण्याचे संकेत काँग्रेसने प्रथम दिले. मात्र कलंकित नेत्यांशी सलगी करण्याबाबत काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने काँग्रेस पक्ष त्याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकलेला नाही.
लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असली तरी गांधी यांच्याकडून यादव यांना आघाडी करण्याबाबत कोणतेही आश्वासन मिळाले नाही. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू इतक्याच आश्वासनावर लालूप्रसाद यादव यांची बोळवण करण्यात आली, हा स्पष्ट संकेतच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी गेल्या निवडणुकीत राजदशी आघाडी केली असली तरी पुन्हा आघाडी करण्यास पासवान यांचा पक्ष उत्सुक नाही. त्यामुळे पासवान यांच्या पक्षाने बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आघाडी करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे, असे सूत्रांनी
सांगितले. लोकजनशक्ती पक्षाने जद(यू)शी आघाडी करावी आणि काँग्रेसलाही बरोबर घ्यावे, असा मतप्रवाह आहे.काँग्रेस, जद(यू) आणि लोकजनशक्ती पक्ष यांची आघाडीच अधिक उचित ठरेल.