वृत्तसंस्था, व्हॅटिकन सिटी, रोम

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर रोममधील सेंट मेरी मेजर बॅसिलिका येथे शनिवारी साधेपणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी कुमारी मेरीच्या ‘सॅलस पोपुली रोमानी’ प्रतिमेजवळ एक साधी समाधी बांधण्यात आली. अंत्यविधीला वरिष्ठ कार्डिनल आणि पोप यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. त्यापूर्वी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकामध्ये विविध राष्ट्रप्रमुख आणि सर्वसामान्य भाविकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिलला निधन झाल्यानंतर व्हॅटिकनचा कारभार पाहणारे कार्डिनल केविन फारेल यांनी अखेरचे विधी पार पाडले. पोप फ्रान्सिस यांच्या साध्या लाकडी शवपेटिकेचे दफन करण्यापूर्वी कार्डिन फारेल यांनीती सील केली. पोप फ्रान्सिस यांची भक्ती मदर मेरीप्रति समर्पित होती. त्यांच्या इच्छेनुसार सेंट मेरी मेजर बॅसिलिका येथे अंत्यविधी झाला.

पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवारपासून ठेवण्यात आले होते. त्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अखेरच्या क्षणापर्यंत भाविक येत होते. अखेरच्या दिवशीही सेंट पीटर्स चौक भाविकांनी भरला होता. यावेळी उपस्थितांनी अखेरपर्यंत सर्वाधिक वंचितांचा विचार करणारे पोप म्हणून त्यांचे स्मरण केले. तसेच त्यांची साधेपणाची आवड लक्षात ठेवून अंत्यविधीही साधेपणानेच झाला. अंत्यविधीसाठी राष्ट्रप्रमुख, राजे आणि युवराज उपस्थित होते तरीही, त्यांच्या शवपेटीचे स्वागत करण्याचा मान कैदी आणि स्थलांतरितांना देण्यात आला.

अखेरच्या निरोपासाठी लाखोंची गर्दी

अखेरच्या प्रार्थनेसाठी जवळपास अडीच लाख लोक उपस्थित होते. तर व्हॅटिकनचा सेंट पीटर्स चौक ते रोममधील सेंट मेरी मेजर बॅसिलिका या सुमारे सहा किलोमीटर मार्गावरून जाणारी अंत्ययात्रा पाहण्यासाठी जवळपास दीड लाख लोक मार्गालगत होते. मिरवणूक जात असताना भाविकांनी टाळ्या वाजवत ‘पापा फ्रान्सेस्को’ अशा घोषणा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.