अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणखी एका महिलेने लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणारी ती अकरावी महिला आहे. ट्रम्प यांनी मात्र अशा तक्रारी करणाऱ्या सर्वाविरोधात खटला भरण्याचे आव्हान दिले आहे. महिलांच्या आरोपांमुळे ट्रम्प यांची प्रचारमोहीम जवळपास अपयशी ठरली आहे. लॉस एंजल्स येथे जेसिका ड्रेक या चित्रपट तारकेने सांगितले, की मी दहा वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील लेक टाहो येथे गोल्फ स्पर्धेच्या निमित्ताने ट्रम्प यांना भेटले होते व त्या वेळी ट्रम्प यांनी मला खोलीत बोलावून घेतले. माझ्याबरोबर इतर काही महिलाही होत्या. नंतर ट्रम्प यांनी मला व इतर दोन महिलांना जवळ ओढून जबरदस्तीने तिघींचे चुंबन घेतले. त्यानंतर ट्रम्प यांनी मला त्यांच्या खोलीत आल्याबद्दल १० हजार डॉलर देऊ केले होते. नंतर पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने मला फोन केला व तू आता पुन्हा एकटी ट्रम्प यांच्या खोलीत ये असे सांगितले, पण मी तसे करण्यास नकार दिला. मी खोलीवर परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने हा फोन करण्यात आला होता व त्यांनी मला पुन्हा बोलावले होते. ट्रम्प यांनी मला पार्टी देण्याचे आमिषही दाखवले होते. नंतर ट्रम्प यांनी अशी विचारणा केली, की तुला किती पैसे पाहिजे ते सांग. ते १०००० डॉलर्स द्यायला तयार होते, पण ते मी नाकारले. ड्रेक हिच्यासमवेत पत्रकार परिषदेला त्यांच्या वकील ग्लोरिया अलरेड उपस्थित होत्या.

आतापर्यंत अकरा महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले असून, त्यांची महिलांविषयी आक्षेपार्ह उद्गारांची २००५ मधील  ध्वनिचित्रफीत अलीकडेच जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती.

अध्यक्षीय निवडणुकीत मीच जिंकणार

येत्या ८ नोव्हेंबरला होणारी अध्यक्षीय निवडणूक मीच जिंकेन असे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मुख्यप्रवाहातील प्रसारमाध्यमे व राजकीय तज्ज्ञ यांनी मात्र ट्रम्प यांची जिंकण्याची शक्यता फार कमी असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी निवडणुकीत आघाडी घेतली असून ट्रम्प यांनी, तरीही मीच जिंकेन असा दावा केला आहे. क्लीव्हलँड येथील सभेत ट्रम्प यांनी सांगितले की, आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. इतरांना जिंकण्याची संधी फार कमी आहे. या वेळी उपाध्यक्षपदाचे उमेदवार माइक पेन्स व न्यूयॉर्कचे माजी महापौर रूडी गिलीयानी उपस्थित होते. ट्रम्प यांच्या भाषणात काही निदर्शकांनी अडथळे आणले. ट्रम्प यांनी ते क्लिंटन यांचे भाडोत्री लोक असल्याचे म्हटले व निदर्शकांना चालते होण्याचा इशारा दिला. निवडणुकीत हेराफेरी करण्याचा क्लिंटन यांचा इरादा असल्याचा आरोप त्यांनी केला.