बाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला पश्चिम उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये मशिदीच्या फेरबांधणीसाठी आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लावल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या मीरतमधील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोस्टर लावण्यामागे या संघटनेचाच हात असल्याचे सांगितले जाते.

या पोस्टरमधील मजुकरानुसार, या आंदोलनाचे नेतृत्व पीएफआय करत आहे. फसवणुकीचे २५ वर्षे विसरू नका. बाबरी मशीद पुन्हा उभी करा, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. अशा पद्धतीचे पोस्टर उत्तर प्रदेशमधील मीरत, गाझियाबाद, अलीगड, हाथरस आणि सहारनपूर येथे आढळून आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीएफआयकडून पश्चिम उत्तर प्रदेशमधील काही लोकांना घेऊन दिल्लीमध्ये आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे बजरंग दल आणि शिवसेनेने बाबरी विध्वंस दिवस हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. दि. ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशिदीच्या वरील भाग पाडण्यात आला होता. तेव्हापासून अयोध्येत राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदवरून वाद सुरू आहे. त्याची सर्वोच्च न्यायालयात ५ डिसेंबर रोजी नियमित सुनावणी सुरू होणार होती. पण सध्या ही सुनावणी दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.  अयोध्या वादाप्रकरणीची सुनावणी ८ फेब्रुवारीपर्यंत टाळली आहे.

दरम्यान, बाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.