Prajwal Revanna Case: जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षातून हकालपट्टी केलेले माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने शनिवारी ही शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने रेवण्णाला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर आपल्या फार्महाऊसमध्ये बलात्कार केल्याचा रेवण्णावर आरोप होता.
प्रज्ज्वल रेवण्णा हा भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावताना देवेगौडा यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. न्यायालयात शिक्षेची सुनावणी सुरू असताना प्रज्ज्वल रेवण्णाला रडू कोसळले. मी काहीही चूक केली नसून न्यायालयाने दया दाखवावी, अशी विनंती त्याने केली.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार प्रज्ज्वल न्यायालयात म्हणाला की, मी राजकारणात वेगाने पुढे जात होतो, ही माझी एकमेव चूक ठरली. तसेच ज्या महिलांनी माझ्या विरोधात तक्रार केली आहे, त्यांना जाणूनबुजून पुढे आणले गेले आहे. या महिलांची तक्रार देण्याची तयारी नसतानाही त्यांना पुढे करण्यात येत आहे.
माजी खासदार प्रज्ज्व रेवण्णा पुढे म्हणाला की, माझेही कुटुंब आहे. मी गेल्या सहा महिन्यात माझ्या आई-वडिलांना पाहिलेही नाही. माझी शिक्षा थोडी कमी करावी, अशी विनंती करतो.
“मी अनेक महिलांवर बलात्कार केला, असा माझ्यावर आरोप होत आहे. पण एकाही महिलेने स्वेच्छेने माझ्याविरोधात तक्रार केलेली नाही. मात्र २०२४ निवडणुकीच्या केवळ सहा दिवस आधी माझ्याविरोधात तक्रार करण्यात आली. सरकारी वकिलांनी जाणूनबुजून महिलांना पुढे आणून माझ्याविरोधात तक्रार करण्यास भाग पाडले”, असे प्रज्ज्वल यांनी न्यायालयात सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा विरोधात बलात्कार आणि लैंगिक छळाचे चार गुन्हे दाखल आहेत. २०२४ मध्ये ३१ मे रोजी प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीहून परतताच त्याला अटक झाली होती. त्यानंतर १ ऑगस्ट २०२५ रोजी एका प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरविले गेले. घरकाम करणाऱ्या महिलेवर २०२१ साली दोनवेळा बलात्कार केल्याचा प्रज्ज्वल रेवण्णावर आरोप ठेवण्यात आला आहे.
प्रज्ज्वल रेवण्णाने बलात्काराच्या तक्रारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडितेने अश्लील व्हिडीओ व्हायरल होईपर्यंत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असे त्याने सांगितले. काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती आणि तिच्या कुटुंबियांनी याची तक्रार दिली.
रेवण्णाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. सप्टेबंर २०२४ मध्ये एसआयटीने १,६३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यात ११३ साक्षीदार आहेत.